पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आठवीत शिकणा-या १४ वर्षाच्या भंगार व्यवसायिकाच्या मुलाचे अपहरण करुन ४० लाखाची खंडणी मागणा-या आरोपींना पिंपरी- चिंचवड पोलिसांनी अवघ्या चार तासात गजाआड करुन त्यांचा अपहरणाचा डाव हाणून पाडला.
या तिन्ही आरोपींकडून तीन मोबाईल, एक पिस्तूल, एक कोयता, एक सुरा, छत्री, हातोडा आणि मास्क असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. हॉटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी या तीन आरोपींनी मुलाचं अपहरण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तेजस, अर्जुन आणि विकास अशी या तिघांची नावे आहेत. तर, या तिघांनी अपहरणासाठी मारुती झेन कार वापरली होती. पोलिसांनी ती कारही जप्त केली आहे.
या मुलाला घरासमोरुन मंगळवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास तिघांनी उचलून नेले होते. त्याचे अपहऱण झाल्यानंतर या खंडणीखोरांनी मुलाच्या काकाला फोन करुन ४० लाखांच्या खंडणीची मागणी केली. ही मागणी करण्यासाठी तब्बल तीन वेळा फोन केले. पण, पहिल्याच फोननंतर कुटुंबियांनी पोलिसांना ही घटना सांगितली. पोलिसांनी सुध्दा तात्काळ सूत्रे हलवत मुलाचा शोध सुरू केला.
सर्वात अगोदर पोलिसांनी घरासमोरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. यात तिघे आरोपी जबरदस्ती मुलाला कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यानंतर ज्या फोनवरुन खंडणीसाठी फोन येत होते तो नंबर ट्रेस केला. तेव्हा खंडणीखोर खेड शिवापूरहून सासवड येथे जात असल्याचे समोर आले. तेव्हा आम्ही ग्रामीण पोलिसांना राजगड आणि सासगड पोलिसांना फोन करुन घटनेबद्दल सांगितले.
यावेळी मुलाच्या सुरक्षिततेसाठी आणि खंडणीखोर ताब्यात घेण्यास सुचवले होते. पोलिसांनी रचलेल्या प्लॅननुसार, कोडिट नाका येथे खंडणीखोरांना ताब्यात घेतले. त्यानंतर अपहरण करण्यात आलेल्या मुलाला सुखरुपपणे त्याच्या आई-वडिलांकडे सोपवण्यात आले. मुलाच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kidnapping of 14-year-old boy in Pune, ransom of 40 lakhs