नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे एका घटस्फोटित मुलीला तिच्या वडिलांच्या निधनानंतर मध्य रेल्वेमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली. स्मिता थूल असे या महिलेचे नाव असून, वडिलांच्या मृत्यूनंतर बऱ्याच दुर्दैवी घटनांचा सामना केल्यानंतर थूल कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेच्या अख्त्यारीत येणाऱ्या सेवाग्राम रेल्वे स्थानकावर पंप ड्रायव्हर म्हणून रामभाऊ थूल नोकरी करायचे. मार्च २०१९ मध्ये कामावर असताना रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे त्यांच्यावर अवलंबून असलेली त्यांची पत्नी नीरावंती आणि मुलगा नितीन पूर्णपणे निराधार झाले. त्याचवेळी त्यांची मुलगी स्मिता हिचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे ती देखील आपल्या दोन मुलांसह माहेरीच राहायची. स्मिता सुद्धा वडिलांवरच अवलंबून होती. रामभाऊंच्या मृत्यूनंतर पाच जणांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. अशात नीरावंती या मुलाला म्हणजेच नितीनला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी, यासाठी प्रयत्न करणार होत्या. पण, त्यापूर्वीच ऑगस्ट २०१९ मध्ये नितीनचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. अवघ्या पाच महिन्यांत दोन मोठी संकटे ओढवल्याने रामभाऊंच्या कुटुंबाचे मनोबल खचून गेले. पण नीरावंती यांनी मुलीला म्हणजेच स्मिताला अनुकंपा तत्वावर नोकरी मिळावी म्हणून मध्य रेल्वेकडे अर्ज केला. पण ज्यावेळी रामभाऊ यांचे निधन झाले, त्यावेळी स्मिता यांचे लग्न झालेले होते आणि त्यांचे घटस्फोटाचे प्रकरण न्यायप्रविष्ट होते आणि अर्थात वडिलांच्या निधनापूर्वी मुलगी व तिची दोन मुले पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून नव्हती; त्यामुळे त्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळणे शक्य नाही, असे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले.
दरम्यान, ऑक्टोबर २०२०मध्ये स्मिता यांना घटस्फोट मिळाला. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा मध्य रेल्वेकडे अर्ज केला. तीनवेळा प्रयत्न करूनही प्रत्येकवेळी त्यांचा अर्ज नाकारण्यात आला. या पत्रव्यवहारात बराच कालावधी गेला. अखेर थूल कुटुंबाने नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानंतर मंत्री महोदयांच्या वतीने रेल्वे मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून स्मिता थूल यांना अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली. चार वर्षांच्या संघर्षानंतर नितीन गडकरी यांच्या पाठपुराव्यामुळे स्मिता थूल यांना मध्य रेल्वेने अनुकंपा तत्वावर नोकरी दिली.
संकटाच्या काळात मदतीचा हात
उदरनिर्वाहाचे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर थूल कुटुंब खचून गेले होते. अशावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी संकटाच्या काळात थूल मदतीचा हात दिला. त्याबद्दल नीरावंती थूल आणि स्मिता थूल यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
Divorced girl got compassionate job due to Nitin Gadkari’s efforts