निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- निफाड येथे शनिवारी सायंकाळी अचानकपणे शेतीमालाला भाव मिळावा यासाठी आंदोलन सुरू झाले. पोलिसांनी शांततेचे आवाहन करून देखील संतप्त आंदोलकांनी दंगल सुरू केल्याने पोलिसांना कठोर भूमिका स्वीकारणे भाग पडले. लाठीमार, अश्रुधूर अशा गोष्टींचा वापर करून दंगा शांत करण्यात पोलिसांना यश आले. अर्थात हे आंदोलन देखील खोटे होते आणि पोलिसांचा लाठी मार देखील खोटा होता. हे सर्व होते पोलिसांकडून करण्यात आलेला दंगाप्रतिबंधाचा सराव. आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर दंगल नियंत्रणासाठी पोलिसांकडून केली गेलेली ही रंगीत तालीम असल्याने भविष्यात काही सामाजिक ताणतणाव निर्माण झाल्यास परिस्थिती हाताळण्यास पोलीस यंत्रणा सक्षम असल्याची चुणूक यातून दिसून आली.
शनिवारी सायंकाळी लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात काही शेतकरी अचानक घोषणाबाजी करु लागले. कांद्यासह टोमॅटोला भाव मिळालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. याबाबत निफाड पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांचे बंदुकधारी पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दल, रुग्णवाहिका देखील घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शेतकऱ्यांना शांततेचे आवाहन करुनही आंदोलक ऐकण्याच्या परिस्थितीत नसल्याने अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या आदेशाने आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला.
यावेळी आंदोलकांची एकच पळापळ झाली. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, आगामी सण – उत्सवांमध्ये संभाव्य दुर्घटना घडल्यास त्यास कशाप्रकारे प्रत्युत्तर द्यावे, यासाठी पोलिसांनी निफाड येथील बाजार समिती पटांगणात प्रात्यक्षिक घेतले. याचा एक भाग म्हणून सदर प्रात्यक्षिक राबविण्यात आल्याचे समजताच नागरीकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली निफाडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बापू महाजन यांनी पोलिसांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी सायखेडा, लासलगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारीही उपस्थित होते. यापूर्वी निफाड शहराच्या प्रमुख मार्गांवरून पोलिसांचे संचलन देखील करण्यात आले.
Fake agitation to get price for agricultural produce in Niphad, police lathicharge is also fake, see what actually happened…