इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नऊ वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. या वंदे भारत गाड्या म्हणजे, देशभरातील दळणवळण व्यवस्था सुधारणे आणि रेल्वे प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. आज ज्या रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले, त्या खालीलप्रमाणे :
- उदयपूर – जयपूर वंदे भारत एक्सप्रेस
- तिरुनेलवेली-मदुराई- चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस
- हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस
- विजयवाडा – चेन्नई (रेणूगुंटा मार्गे) वंदे भारत एक्सप्रेस
- पाटणा – हावडा वंदे भारत एक्सप्रेस
- कासारगोड – तिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस
- राउरकेला – भुवनेश्वर – पुरी वंदे भारत एक्सप्रेस
- रांची – हावडा वंदे भारत एक्सप्रेस
- जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस
या नऊ वंदे भारत गाड्यांचा एकाचवेळी शुभारंभ होणे म्हणजे देशातील आधुनिक दळणवळण सुविधा क्षेत्रासाठी अभूतपूर्व प्रसंग आहे, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले. “देशातल्या पायाभूत सुविधांच्या विकासाची ही गती आणि व्याप्ती, १४० कोटी भारतीयांच्या आकांक्षांशी तंतोतंत जुळणारी आहे.” असे पंतप्रधान म्हणाले. आज सुरू झालेल्या गाड्या अधिक आधुनिक आणि आरामदायी आहेत, असे त्यांनी सांगितले. या वंदे भारत गाड्या नव्या भारताच्या नव्या उत्साहाचे प्रतीक आहेत, असे ते म्हणाले. वंदे भारत विषयी लोकांमधील वाढत्या आकर्षणाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. वंदे भारत गाड्यांमधून आतापर्यंत एक कोटी अकरा लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहितीही त्यांनी दिली.
आज २५ वंदे भारत गाड्या, विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये लोकांना सेवा देत असल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली. त्यात आज आणखी नऊ वंदे भारत जोडल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले. “वंदे भारत देशातील प्रत्येक भागाला एकमेकांशी जोडेल तो दिवस दूर नाही”, असे ते पुढे म्हणाले. ज्यांना आपला वेळ वाचवण्याची आणि त्याच दिवशी परतीचा प्रवास करण्याची इच्छा आहे, अशा लोकांसाठी वंदे भारत विशेष उपयुक्त असल्याचे त्यांनी नमूद केले. वंदे भारतने जोडलेल्या ठिकाणी,पर्यटनातही वाढ झाली असून त्यामुळे तिथल्या अर्थकारणाला चालना मिळत असल्याचे, त्यांनी सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनात रेल्वेचे महत्त्व अधोरेखित करत, पंतप्रधानांनी पूर्वीच्या काळात या महत्त्वाच्या क्षेत्राकडे दुर्लक्ष झाल्याबद्दल खंत व्यक्त केली. भारतीय रेल्वेच्या कायापालटासाठी सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना, पंतप्रधानांनी वाढीव अर्थसंकल्पाचा उल्लेख केला कारण यंदा रेल्वेसाठीचे बजेट २०१४ च्या रेल्वे बजेटच्या ८ पट आहे. त्याचप्रमाणे दुहेरीकरण, विद्युतीकरण आणि नवीन मार्गांचे काम सुरू आहे, असेही ते पुढे म्हणाले.
“विकासाच्या मार्गावर असलेल्या भारताने आता आपल्या रेल्वे स्थानकांचेसुद्धा आधुनिकीकरण करायला पाहिजे” असे पंतप्रधानांनी ठामपणे सांगितले. हाच विचार मनात ठेवत पहिल्यांदाच रेल्वे स्थानकांचा विकास आणि आधुनिकीकरणाची मोहीम भारतात सुरु केली आहे. रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी, सध्या विक्रमी संख्येने फुट ओव्हरब्रिजेस(पादचाऱ्यांसाठी, दोन फलाट तसेच रेल्वे स्थानकाला स्थानकाबाहेरील परिसराशी जोडणारे पूल), उद्वाहने आणि सरकते जिने, देशात उभारले जात आहेत. काही दिवसांपूर्वीच ५०० हून जास्त प्रमुख रेल्वेस्थानकांच्या पुनर्विकासाचे काम देशात सुरू झाले. अमृत काळात निर्माण होणारी नवीन रेल्वेस्थानके, अमृत भारत स्थानके म्हणून ओळखली जातील असे पंतप्रधान म्हणाले. “येत्या काळात ही रेल्वे स्थानके नव्या भारताची ओळख बनतील” असेही त्यांनी पुढे सांगितले.
रेल्वे विभागाने रेल्वे स्थानकांचा स्थापना दिवस अर्थात रेल्वे स्थानके कधी उभारण्यात आली तो दिवस साजरा करायला सुरुवात केली आहे याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कोइंबतूर येथे झालेल्या अशा प्रकारच्या महोत्सवी कार्यक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. कोइंबतूर रेल्वे स्थानकाने १५० वर्षे पूर्ण केली आहेत. “रेल्वे स्थानकांचा वाढदिवस साजरा करण्याची ही नवीन प्रथा यापुढे आणखी जोमाने पाळली जाईल आणि अधिकाधिक लोकांना त्यात सामावून घेतले जाईल” असे ते म्हणाले.
अकरा राज्याला दळवळण वाढीला मिळेल चालना
या नऊ रेल्वेगाड्यांमुळे राजस्थान, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, ओदिशा, झारखंड आणि गुजरात या अकरा राज्यांदरम्यान दळणवळण वाढीला लागेल. या वंदे भारत रेल्वेगाड्या त्यांच्या प्रवासाच्या मार्गावरील सर्वात वेगवान रेल्वेगाड्या असतील आणि त्यामुळे प्रवाशांचा बराच वेळ वाचवण्यात सहाय्यभूत ठरतील. सध्या या मार्गांवर धावणाऱ्या सर्वात वेगवान रेल्वेगाड्यांच्या तुलनेत, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि कासारगोड-थिरुवनंतपुरम वंदे भारत एक्सप्रेस सुमारे ३ तासांनी वेगाने धावेल; हैदराबाद-बेंगळुरू वंदे भारत एक्सप्रेस 2.5 तासांपेक्षा जास्त वेगाने; तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस २ तासांपेक्षा जास्त वेगाने; रांची-हावडा वंदे भारत एक्सप्रेस, पाटणा-हावडा वंदे भारत एक्सप्रेस आणि जामनगर-अहमदाबाद वंदे भारत एक्सप्रेस सुमारे १ तास वेगाने तर उदयपूर-जयपूर वंदे भारत एक्स्प्रेस सुमारे अर्धा तास वेगाने धावतील.
देशभरातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांदरम्यान दळणवळण सुधारण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार, राउरकेला-भुवनेश्वर-पुरी वंदे भारत एक्सप्रेस आणि तिरुनेलवेली-मदुराई-चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस पुरी आणि मदुराई या महत्त्वाच्या धार्मिक शहरांना जोडतील. तसेच, विजयवाडा – चेन्नई वंदे भारत एक्सप्रेस रेणूगुंटा मार्गे धावेल आणि तिरुपती तीर्थक्षेत्राला संपर्क प्रदान करेल.
या वंदे भारत रेल्वेगाड्या सुरू केल्याने देशातील रेल्वे सेवेला एक नवा दर्जा प्राप्त होईल. कवच तंत्रज्ञानासह जागतिक दर्जाच्या सुविधा आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज असलेल्या या गाड्या सामान्य जन, व्यावसायिक, व्यापारी, विद्यार्थी समुदाय आणि पर्यटकांना आधुनिक, जलद आणि आरामदायी प्रवासाचे साधन उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरतील.
PM flags off nine Vande Bharat Express trains