इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मध्य प्रदेशमधील उज्जैन शहरात गावठी कट्ट्याने गोळीबार करुन एका महिलेने पती व दीराची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तीने हत्या केल्यानंतर ती पोलिस स्थानकात गेली व गुन्हयाची कबुली दिली. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे.
गोळी झाडणा-या महिलेचे नाव सविता कुमारिया असून ती ३८ वर्षाची आहे. ती अंगणवाडी सेविका असल्याचे बोलले जात आहे. या घटनेत पती राधेश्याम कुमारिया (४२) तर दीर दिनेश कुमारिया (४६) यांचा मृत्यू झाला आहे. या महिलेने गावठी कट्ट्यातून सहा राऊंड फायर केले. त्यात दोघांचा मृत्यू झाला.
कु्मारिया कुटुंबात जमीनीचा वाद होता. जमीन द्यायला दीर तयार नव्हता व तर पती जमीन घेण्यासाठी आग्रही नव्हता. त्यामुळे या महिलेचा दोघांवर राग होता. त्यामुळे तीने दोघांवर गोळीबार केला. यात त्यांचा मृत्यू झाला.