नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी यांनी लडाख या केंद्रशासित प्रदेशात राज्य महामार्ग, प्रमुख आणि इतर जिल्हा रस्तेमार्गांचा समावेश असलेल्या २९ रस्ते प्रकल्पांसाठी ११७०.१६ कोटी रुपयांच्या निधी वाटपाला मंजुरी दिली आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये श्री गडकरी म्हणाले की, २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी राष्ट्रीय महामार्ग आणि केंद्रीय रस्तेमार्ग आणि पायाभूत सुविधा निधी(CRIF) या अंतर्गत ८ पुलांसाठी एकूण १८१.७१ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.
लडाख, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश आणि भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला दुसरा केंद्रशासित प्रदेश आहे आणि मंजूर केलेल्या उपक्रमांद्वारे तेथील दुर्गम गावांशी संपर्क सुधारेल. यामुळे लडाख मधील आर्थिक गतीविधींना, विशेष करून कृषी आणि पर्यटनाला चालना मिळून सर्वांगीण पायाभूत सुविधांच्या विकासाला हातभार लागेल, अशी अपेक्षा आहे, असे आपल्या एक्स पोस्टमध्ये गडकरी म्हणाले आहेत.