येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला तालुक्यातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध होण्यासाठी १०० खाटांचे येवला उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले आहे. या रुग्णालयातील निवासी डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून १४ कोटी ४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामाध्यमातून येवला येथे सुसज्ज असे निवासस्थान उभारण्यात येणार आहे.
येवला १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात निवासी डॉक्टर, अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी सुसज्ज निवासी संकुल निर्माण करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्यांच्या प्रयत्नांतून बाभुळगाव येथे निवासी डॉक्टर,अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकाच ठिकाणी सुसज्ज निवासस्थान निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी १४ कोटी ४ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. लवकरच या कामाला सुरुवात होऊन अधिकाऱ्यांना निवासस्थान उपलब्ध होणार आहे.
या अगोदर मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून प्रांत अधिकारी,तहसीलदार पोलीस निरिक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांसाठी सुसज्ज असे निवासस्थान निर्माण करून देण्यात आले आहे. येवला नगरपालिका मुख्याधिकारी यांच्याही निवासस्थानाचे काम सुरु आहे.