वणी (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वणी – बोरगाव महामार्गावरील घागबारी येथील वळणावर पळसन येथून नाशिक जाणाऱ्या एस. टी. महामंडळाच्या बसचा साडेबारा वाजेदरम्यान अपघात झाला आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून त्यांना प्राथमिक उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एका जखमी महिलेची परिस्थिती गंभीर असल्याने तिला पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पळसन कडून दुपारी नाशिककडे जाणारी बस घागबारी येथील वळणावर चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खोल खड्यात उतरल्याने पुष्पा कमलाकर भोये (२१, रा.करंजी, ता. दिंडोरी), मधूकर वाघमारे (७५, रा.कुंकुडमुंडा, ता. सुरगाणा), ताराबाई दिनकर देशमुख (६०, रा.सुरगाणा) हे जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेतून प्राथमिक उपचारासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
पुष्पा भोये हिच्या पायाला गंभीर दु:खापत झाल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघात ठिकाणी घागबारी येथील पोलिस पाटील गोपाळ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते तुळशीदास पिठे, युवराज पिठे,नितीन चौधरी, प्रकाश गायकवाड यांनी मदत केली. सुरगाणा पोलिस ठाण्यात मोटार अपघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली मांगू भोये करीत आहे.
Accident of ST bus coming to Nashik on Vani-Borgaon highway