नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यात दुष्काळ परिस्थिती निर्माण झालेली असतांना सरकार कोणतेही उपाययोजना करत नाही. पीक विमा कंपनीने पिके वाया जाऊनही अजून शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई देत नाही, सलग एकवीस दिवस पाऊस पडला नाही. तर कोणतेही पीक हातात येत नाही हे प्रशासनाला माहिती आहे. आज अनेक दिवसांपासून पाऊस उघडलेला आहे, पीक पंचनामे अजूनही सुरु नसल्याने सरकार शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील आहे. या सरकारला शेतकऱ्याबद्दल कोणतीही सकारात्मक भावना नाही शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी सरकारला आम्ही विरोधी पक्ष म्हणून जाब विचारू आणि शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दिले. पावसाने ओढ दिल्यानंतर बिकट स्थीती निर्माण झाली आहे. त्यात अद्याप मोठे एकही नेते बांधावर गेले नाही. त्यामुळे आदित्य ठाकरे यांचा हा दौरा चांगलाच चर्चेत आला.
निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळ परिस्थिती पहाणी करतांना शेतकऱ्यांसोबत संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार अनिल कदम, देवळालीचे माजी आमदार योगेश घोलप, जिल्हा अध्यक्ष विक्रम रंधवे, तालुका अध्यक्ष सुधीर कराड, आशिष शिंदे, भाऊसाहेब कमानकर, शरद खालकर, खंडू बोडके, शरद कुटे, अशपाक शेख, दिलीप कदम, रामदास खालकर, श्याम खालकर यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
निफाड तालुक्यातील अनेक गावात जून महिन्यानंतर पाऊस पडलेला नाही शेतकऱ्यानी शेतात लागवड केलेले खरीप हंगामातील पिके वाया गेली आहे, विकत पाणी घेऊन पिकवलेली टमाटे भाजीपाला कवडीमोल भावात विकावा लागत आहे. खर्च सुध्दा वसूल होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे मात्र शासन या संदर्भात कोणतेही पाऊल उचलतांना दिसत नसल्याने युवा नेते आदित्य ठाकरे यांनी दुष्काळी भागाचा पहाणी दौरा केला. या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ठाकरे यांनी संवाद साधला. शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या व्यथा मांडल्या. संजय कमानकर यांच्या टोमॅटो आणि प्रवीण कमानकर यांची सोयाबीन पावसाअभावी पूर्णपणे वाया गेली असल्याची प्रत्यक्ष पहाणी ठाकरे यांनी केली.
यावेळी फसवे कांदा अनुदान, फसवी कर्जमाफी, जिल्हा बँकेचे कर्ज वाटप बंद, पिकांसाठी केलेला खर्च वाया गेला, शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळत नाही, खरीप हंगाम गेला असून आता पावसा अभावी रब्बी च्या देखील अशा मावळल्या आहे. शेतकऱ्यांनी मुलांची शिक्षण कसे करावे, लग्न कसे करावे, कुटुंब कसे चालवावे, आरोग्याचा प्रश्न कसा सोडवावा असे अनेक समस्याचा पाढा आदित्य ठाकरे यांच्या समोर मांडला. यावेळी ठाकरे म्हणाले की हे घटना बाह्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देणार नाही. लोकांची भीती यांना नाही. त्यामुळे ते बिनधास्त पणे कुठे काही बोलतात. प्रत्येक घटकाला केवळ आश्वासन देतात. आज शेतकरी आर्थिक समस्यामध्ये असतांना अद्याप दुष्काळ परिस्थिती वर कोणतेही पाऊल सरकारने उचलले नाही पण आम्ही मात्र सरकारला याचा जाब विचारू अशी ग्वाही ठाकरे यांनी दिली.