मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मनमाड पासून जवळ असलेल्या ऐतिहासिक अंकाई किल्ल्याच्या पायथ्याशी एका शेतात भुयारी मार्ग आढळून आला आहे. आता याची पाहणी पुरातत्व विभाग करणार आहे. हा भुयारी मार्ग किती लांब आहे याचा उलगडा पुरातत्व विभागाने पाहणी केल्यानंतर स्पष्ट होणार आहे. शेतात अचानक नांगरताना घडलेल्या या गोष्टीमुळे मात्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
आज शेतकरी शेतात नांगरीनी करत असताना एक मोठं भागदाड पडले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे शेतकरी घाबरला त्याने मोबाईल वरून माहिती दिल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक आणि ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर घडलेल्या घटनेची माहिती पुरातत्व विभागाला कळविण्यात आली.
अंकाई किल्ला येथे जैन, बौद्ध लेणी सोबत मंदिर आणि एक मुस्लिम बांधवाची दरगाह देखील आहे. या अगोदर देखील भुयारी मार्ग सापडले असून किल्ल्याच्या परिसरात अनेक भुयारी मार्ग असल्याचे जुनेजाणते लोक सांगतात.