नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – यावर्षी गणपती विर्सजन मिरवणुक २८ सप्टेंबरला असून याच दिवशी ईद-ए-मिलादचाही सण आला आहे. या दोन्ही सणांच्या मिरवणूक मार्ग एकच असल्याने मोठा पेच निर्माण झाला होता. मात्र मध्य नाशिक मतदार संघाच्या आमदार प्रा. सौ. देवयानी सुहास फरांदे यांच्या मध्यस्थीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या दालनात दोन्ही समाजातील मान्यवरांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ईद-ए-मिलाद जुलुस २८ सप्टेंबर ऐवजी २९ सप्टेंबर रोजी आयोजीत करण्यास मुस्लिम समाजातील बांधवांनी मान्यता दिली. आ. फरांदे यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हा प्रश्न सुटल्याचे यावेळी मान्यवरांनी सांगितले.
या बैठकीत मा. ईसामोद्यिन खतीब (शहर ए खतीब), शेखन खतीब, हाफीज जफर, अबिब खान, तात्या शेख, वसीम पिरजादे व इतर मुस्लीम समाजातील मान्यवर तसेच गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेंटे, माजी महापौर विनायक पांडे,. सत्यम खंडाळे, गणेश बर्वे, रामसिंग बावरी, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. सदर समन्वय बैठकीमध्ये ईसामोद्यिन खतीब (शहर ए खतीब) यांनी घोषीत केले की, ईद-ए-मिलाद – २०२३ मिरवणुक (जुलूस ) ईद-ए-मिलादच्या दुस-या दिवशी २९ सप्टेंबर रोजी ३.३० वाजता आयोजीत करण्यात येईल.
मुस्लीम धर्मीय मान्वरांनी ईद-ए-मिलाद जुलुस दिनांक २८ ऐवजी २९ सप्टेंबर रोजी आयोजीत केला असल्याने गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष समीर शेंटे व इतर मान्यवरांनी ईसामोद्यिन खतीब (शहर ए खतीब) व इतर मान्वरांना आभार मानून त्यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला. यावेळी किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परीमंडळ – १ नाशिक शहर, प्रशांत बच्छाव, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, नाशिक शहर, सिध्देश्वर धुमाळ, सहा. पोलीस आयुक्त, सरकारवाडा विभाग, नाशिक शहर, गजेंद्र पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर यांनी सर्व मान्यवराचे आभार मानले.
MLA Farande’s efforts solved this dilemma