इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : कल्याण ते कसारा या तिसऱ्या मार्गिकेचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. परंतु भूसंपादनातील अडथळे, विरोध यामुळे अनेक अडचणी आहेत. या मार्गिकेची निर्माण कामे सुरू असली तरी मार्गिका पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल हा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कसारा, आसनगाव हा भाग ग्रामीण क्षेत्रात मोडतो. ठाणे आणि मुंबई भागात गेल्या काही वर्षांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे मुंबईत कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांनी येथे गृहखरेदी केली. काही ठिकाणी अतिक्रमण झाल्याने तेथे मोठ्या चाळी उभ्या राहिल्या आहेत.
स्वस्त घरे उपलब्ध होत असल्याने मागील काही वर्षांत या भागात प्रवाशांचा भार वाढला आहे. त्या तुलनेत प्रवासाची पुरेशी साधने उपलब्ध नाहीत. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर होत आहे. कल्याणपुढे आसनगाव, कसारा भागात प्रवास करण्यासाठी अप आणि डाऊन अशा दोनच मार्गिका उपलब्ध आहेत. या मार्गावरून उपनगरीय, लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या आणि मालगाड्यांच्या फेऱ्या होतात. कल्याण ते कसारा या मार्गिकेवर एकूण ११ स्थानके आहेत. मार्गिकेवर एखादा तांत्रिक बिघाड झाला किंवा रेल्वेगाडीचे इंजिन बंद पडल्यास संपूर्ण रेल्वे वाहतूक ठप्प होते. त्याचा परिणाम प्रवाशांना सहन करावा लागतो.
लांब पल्ल्याच्या आणि मालगाड्यांच्या वाहतुकीमुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतूक उशिराने होत असते. कसारा येथून सीएसएमटी प्रवासासाठी केवळ १८ रेल्वेगाड्या धावतात. त्यामुळे मुंबईत कामानिमित्ताने जाणारे बहुतांश नोकरदार लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करतात. नाशिकहून रस्तेमार्गे मुंबईत येणारा प्रवासी मुंबई नाशिक महामार्गावरील कोंडी टाळण्यासाठी कसारा येथून उपनगरीय रेल्वेगाडीने प्रवास करतो. त्यामुळे त्याचा भार देखील उपनगरीय मार्गिकेवर असतो. गर्दीमुळे रेल्वेगाडीतून पडून अनेकांचे अपघाती बळी गेले आहेत.
पाच पुलांचे काम प्रगतीपथावर
कल्याण-कसारा तिसरी मार्गिका ६७.३५ किलोमीटर लांब असून त्यासाठी ७९२.८२ कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. मार्गिकेसाठी ४९.२३ हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात येत आहे. त्यापैकी ३५.९६ हेक्टर म्हणजेच ७३ टक्के जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. तर १३.२७ टक्के हेक्टर जमीनीचे अधिकग्रहण शिल्लक आहे. प्रकल्पात २०५ लहान आकाराचे पुल बांधण्यात येणार असून २३ पुलांचे काम पूर्ण झाले आहे. नऊ मोठ्या पुलांपैकी पाच पुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
The much awaited Nashik-Kasara local will start?… This is the current situation…