इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापारी, बाजार समिती प्रतिनिधीची मुबंईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सकाळी कोणताच तोडगा निघाला नाही. पण, या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर सायंकाळी केंद्रीय वाणिज्य और उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्याबरोबर चर्चा होणार असल्याची माहिती कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे यांनी फोनवरुन दिली. या बैठकीत या संपावर तोडगा निघण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
सायंकाळच्या या बैठकीत सर्वच नेते उपस्थितीत राहणार असल्याचेही ते म्हणाले. गेल्या बुधवारपासून कांदा व्यापा-यांनी संप पुकारला असून त्यामुळे कांदा लिलाव ठप्प झाले आहेत. त्यामुळे कोटयवधींचे व्यवहार झाले नाही. कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करावे यासह विविध मागण्यांसाठी व्यापाऱ्यांनी पुकारलेला असून त्याचा आज सातवा दिवस आहे.
त्यामुळे आज मुंबईत होणा-या बैठकीत या विषयावर तोडगा निघेल असे बोलले जात आहे. सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. पण, चर्चा झाली. त्यानंतर केंद्राच्या अखत्यारीतला हा विषय असल्याने अजित पवार यांनी थेट पियूष गोयल यांना फोन केला. ते मुंबईतच असल्यामुळे सायंकाळी ही बैठक होणार असल्याचे खंडू देवरे यांनी सांगितले. मुंबईच्या या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, पणन मंत्री अब्दुल सत्तार, अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.
या आहेत मागण्या…
दरम्यान कांदा निर्यातीवर लावण्यात आलेले ४० टक्के निर्यात शुल्क कमी करावे. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत कांद्याची खरेदी मार्केट आवारात करुन विक्री रेशन दुकानातून करण्यात यावी. कांद्याचे भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी कांद्याच्या व्यापारावर सरसकट ५ टक्के सबसिडी आणि देशांतर्गत वाहतुकीवर सरसकट ५० टक्के सबसिडी व्यापाऱ्यांना देण्यात यावी. यासह विविध मागण्या आहे.