नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कुठल्याही शहरासाठी अत्याधिक आनंदाची बाब तेव्हा ठरते जेव्हा ते शहर देशाच्या प्रगतीसाठी योगदान देते. विशेषतः संरक्षण क्षेत्रातील योगदान असेल तर त्याचा अभिमान निराळाच असतो. नाशिकच्या वाट्याला हा अभिमान आला असून लवकरच त्याची प्रचिती नाशिककरांना येणार आहे.
केंद्रातील मोदी सरकारने भारतीय हवाई दलासाठी ज्या १२ सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानांची घोषणा केली आहे, ती सगळी विमाने नाशिकमध्ये तयार होणार आहेत. निफाड येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स या कंपनीमध्ये त्यांचे निर्माण होणार आहे. मेक इन इंडिया अंतर्गत हा उपक्रम राबविला जाणार आहे. मुख्य म्हणजे हवाई दलाच्या सुरक्षा ताफ्यात वाढ करण्यासाठी नाशिक शहराचे योगदान लाभत आहे, याचा आनंद व्यक्त होत आहे. हवाई क्षेत्र अधिक सुरक्षित करण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने ही लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. संरक्षण दलाने दिलेल्या माहितीनुसार डिफेन्स एक्विझीशन काउन्सील ने जवळपास ४५ हजार कोटी रुपयांच्या भांडवली अधिग्रहण प्रस्तावांसाठी स्वीकृती आवश्यकता मंजूर केली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेत १५ सप्टेंबरला यासंदर्भात बैठक झाली. त्यात सर्व खरेदी भारतीय विक्रेत्यांकडून प्रोक्योरमेंट श्रेणी अंतर्गत केली जाईल आणि ते आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट्य साधण्यासाठी योगदान देईल, असे सांगितले गेले आहे.
सुखोई हे मल्टीरोल लढाऊ विमान!
सुखोईच्या निर्मितीचा हा प्रकल्प ११ हजार कोटी रुपयांचा असल्याचे संरक्षण खात्याने म्हटले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अपघात झालेल्या १२ विमानांची जागा घेण्याचे काम सुखोई करेल. हे एक मल्टीरोल लढाऊ विमान असून यातून हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर अशा दोन्ही प्रकारे युद्ध लढण्याची क्षमता आहे, असेही संरक्षण अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. देशात तयार होणाऱ्या लढाऊ विमानांच्या दृष्टीने हे एक मोठे पाऊल ठरणार आहे.
Nashik HAL got a big job… Sukhoi planes will be ready!