नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामहिम राज्यपाल महाराष्ट्र राज्य यांचा १२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौरा प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने सर्व शासकीय यंत्रणांनी राजशिष्टाचाराचे पालन करून काटेकोरपणे नियोजन करावे.त्याचप्रमाणे आवश्यक माहिती विहित नमुन्यात वेळेत सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात राज्यपाल महोदय यांचा प्रस्तावित दौरा कार्यक्रमाबाबत पूर्व तयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक (पूर्व) उमेश वावरे, उपवनसंरक्षक (पश्चिम) पंकज गर्ग, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, पोलीस उपायुक्त नाशिक प्रशांत बच्छाव, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदिप चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, तहसिलदार महसुल परमेश्वर कासुळे, दिंडोरी तहसिलदार पंकज पवार, येवला तहसिलदार शरद घोरपडे, त्र्यंबकेश्वर तहसिलदार श्वेता संचेती यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यावेळी म्हणाले, दौरा अनुषंगाने नियोजित हेलिपॅड, शासकीय विश्रामगृह, व दौरा ठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात यावी. वाहतुक व्यवस्थेचेही सुयोग्य नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे राज्यपाल महोदयांच्या ताफ्यातील वाहने यांची प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासणी करून ती सुस्थितीत असल्याची खात्री करावी शासकीय विश्रामगृह, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ या ठिकाणी राज्यपाल महोदय यांची भेट प्रस्तावित आहे. त्या अनुषंगाने या ठिकाणीही अनुषंगिक सुरक्षा व इतर बाबींची व्यवस्थेबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावयाचे आहे.
जिल्हाधिकारी जलज शर्मा यावेळी म्हणाले, राज्यपाल महोदय पंतप्रधान आवास योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, हर घर जल योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, प्रधानमंत्री किसान योजना, कृषि योजना, शाळा इमारत, डिबीटी प्रदान लाभ योजना त्याचप्रमाणे जिल्ह्यातील आश्रमशाळा, अंगणवाडी यांचा आढावा घेणार आहेत. त्या अनुषंगाने संबंधित विभागांनी याबाबतची माहिती विहित नमुन्यात सत्वर सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.
Governor’s visit to Nashik on October 12, visits to this place and review of the plan will also be done