नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळांमध्ये पडणारे अंतर रोखण्यासाठी चौकातील थांब्यास यंदा प्रत्येकी वीस मिनीटांची मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गेल्या वर्षीच्याच सहभाग क्रमांकांना मंजुरी देण्यात आली. सहभाग क्रमांक ठरविण्यावरून मंडळ पदाधिका-यांमध्ये वादावादी झाली. पण, गेल्या वर्षीच्या मांडणीप्रमाणेच यंदाही चित्ररथ जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
भद्रकाली पोलिस ठाण्यात मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणूक नियोजन बैठक पार पडली. पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्यासह गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, माजी महापौर विनायक पांडे, प्रथमेश गिते आदींसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीतले निर्णय असे…
या बैठकीत २०२२ मधील २१ क्रमांकांची यादी सवार्नुमते मंजूर करण्यात आली. सकाळी दहाला मंडळे जमतील, अकराला मिरवणुकीस होणार प्रारंभ
होईल. क्रमात असलेल्या मंडळाने दिरंगाई केल्यास मागील मंडळ पुढे जाईल. मुख्य चौकांत मंडळे फक्त १५-२० मिनिटे थांबतील. गुलाल, डीजेचा वापर होणार नाही, ध्वनी मर्यादेचे पालन होईल. ढोल पथकांमध्ये वादक संख्या मर्यादित असेल. अंतर पडलेल्या मंडळांवर उत्सवानंतर कारवाई केली जाईल.रात्री १२ वाजता मिरवणूक संपन्न होईल. फक्त गणेशमूर्ती विसर्जनस्थळी नेण्यात येतील
अशा क्रमाने मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील
नाशिक महापालिका, रविवार कारंजा मित्रमंडळ (चांदीचा गणपती), गुलालवाडी व्यायामशाळा, भद्रकाली कारंजा मित्रमंडळ (साक्षी गणेश), श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ पेठ रोड, सूर्यप्रकाश नवप्रकाश मित्रमंडळ (नाशिकचा राजा), सरदार चौक मित्रमंडळ, रोकडोबा मित्रमंडळ, शिवसेवा मित्रमंडळ, शिवमुद्रा मित्रमंडळ (मानाचा राजा), युवक मित्रमंडळ, दंडे हनुमान मित्रमंडळ, युनायटेड फ्रेंड सर्कल, शनैश्वर युवक समिती चौक मंडई, नेहरू चौक मित्रमंडळ पिंपळपार, वेलकल सहकार्य मित्रमंडळ, गणेश मूकबधिर मित्रमंडळ, युवा संघर्ष प्रतिष्ठाण, गजानन मित्रमंडळ, महालक्ष्मी चाळ सोशल फाऊंडेशन, उत्कर्ष मित्रमंडळ नाईकवाडीपुरा या क्रमाने मंडळे मिरवणुकीत सहभागी होतील.