नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -अन्न व औषध प्रशासन, नाशिक कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीवरुन मे. मुक्ताई ट्रेडर्स, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक येथे धाड टाकली असता सदर ठिकाणी विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा १ लाख ४० हजार ६७९ रुपये किमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले. सदरचा साठा हा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्या कारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांनी ताब्यात घेतला. त्यामुळे या प्रकरणातील धनंजय बाळासाहेब व्यवहारे, मे. मुक्ताई ट्रेडर्स, पेठ फाटा, पंचवटी, नाशिक यांचेविरुध्द पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या छाप्याबरोबरच नाशिक रोड पोलिस स्टेशनच्या अधिका-यांसमवेत या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस.एस. पटवर्धन यांनी मे. अथर्व जनरल स्टोअर्स, सिध्दार्थ नगर, देवळाली गाव, नाशिक येथे देखील तपासणी केली असता तेथे विविध प्रकारचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा ६१ हजार ६३५ रुपये किंमतीचा साठा विक्रीसाठी साठविला असल्याचे आढळले. सदरचा साठा हा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती एस. एस. पटवर्धन यांनी ताब्यात घेतला. या प्रकरणातील निलेश राजेंद्र भालेराव, मे. अथर्व जनरल स्टोअर्स, सिध्दार्थ नगर, देवळाली गाव, नाशिक यांचेविरुध्द नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये भा.द.वि कलम 328 व अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरच्या दोन्हीही प्रकरणात अधिक तपास पंचवटी व नाशिक रोड पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे. सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) म.मो. सानप व वि.पां. धवड यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी अ.उ. रासकर, अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), श्रीमती एस. एस. पटवर्धन, पी. एस. पाटील, उ.रा.सुर्यवंशी यांच्या पथकाने सहआयुक्त (नाशिक विभाग) सं.भा.नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.