देवळा (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तालुक्यातील सातवाईवाडी येथे हताश झालेल्या कांदा उत्पादक तरुण शेतकऱ्याने घराजवळच्या विहिरीत उडी मारत आत्महत्या केल्याची घटना घडली. प्रताप बापू जाधव (३६) असे आत्महत्या करणा-या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. जाधव हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे.
प्रतापने यावर्षी कांदा लागवड करून त्याच्यासाठी मोठा खर्च केला होता. मात्र कांद्याला कवडीमोल भाव मिळाला. त्यातच साठवलेला कांदा खराब झाला. त्यामुळे घेतले कर्ज कसे फेडायचे आणि दैनंदिन खर्च कसा भागवायचा या विवंचनेत तो होता. त्यातच त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. सततची नापिकी आणि या वर्षी पावसाने ओढ दिल्यामुळेही तो चिंतेत होता.
शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्याने विहिरीत उडी मारत आत्महत्या केली. घरातील लोकांना पहाटे तो न दिसल्यामुळे त्यांनी शोध घेतला असता त्यांचे स्वेटर विहिरी जवळ दिसल्याने ही घटना समोर आली. यावर्षी कांद्याचे सतत कोसळलेल्या भावामुळे खर्चही निघत नसल्याच्या कांदा उत्पादक शेतक-यांची तक्रार आहे. त्यातच पावसाने मध्ये ओढ दिल्यामुळे दुबार पेरणीचे संकटही बहुतांश ठिकाणी आहे. या सर्व शेतक-यांच्या व्यथा असल्यामुळे शेतकरी असे टोकाचे पाऊल उचलत आहे. पण, त्यात आत्महत्या करणे हा मार्ग नाही…
A young onion farmer in Devla taluka committed suicide by jumping into a well