नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात शुक्रवारी वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी गळफास लावून घेत आत्महत्या केली. या तिघांमध्ये २० वर्षीय परप्रांतीय तरूणीचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड व म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना रासबिहारी लिंकरोडवरील मानेनगर भागात घडली. रामदास बाजीराव राजभोसले (५० रा.आदिती बिर्ला सोसा.मानेनगर) यांनी शुक्रवारी दुर्धर आजारपणास कंटाळून आपल्या राहत्या घरातील पंख्यास दोरी बांधून गळफास लावून घेत आत्महत्या केली. याबाबत दिनेश राजभोसले यांनी दिलेल्या खबरीवरून म्हसरूळ पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.
दुसरी घटना सिडकोतील उत्तमनगर भागात घडली. उमेश भगवान महाले (२७ रा.सेवा मेडिकल मागे उत्तमनगर) या युवकाने शुक्रवारी अज्ञात कारणातून घरात कुणी नसतांना वरच्या मजल्यावरील हॉलमध्ये छताच्या कडीला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत भाऊलाल महाले यांनी दिलेल्या खबरीवरून अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देशमुख करीत आहेत.
तिसरी घटना अंबड गावातील स्वामीनगर भागात घडली. येथे राहणारी मुन्नी अजय गुप्ता (२० रा. सर्वज्ञ पार्क) या युवतीने शुक्रवारी अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्यास साडी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच भाऊ बिट्टू गुप्ता याने तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार सोनार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten