नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गाडगे महाराज धर्म शाळेजवळ खाद्यपदार्थाच्या हातगाडीसह गॅरेजवर दोघांनी ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिल्याची घटना झाडेकरी कोट भागात घडली. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने मोठा अनर्थ टळला असून या घटनेत व्यावसायीकांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून, त्याच्या साथीदार अद्याप फरार आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुषार चंद्रकात काळे (रा.झाडेकरी कोट गाडगे महाराज धर्म शाळेजवळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याचा साथीदार अद्याप फरार आहे. याबाबत लक्ष्मी दिलीप बलसाने (रा.झाडेकरी कोट) यांनी तक्रार दाखल केली आहे. बलसाने यांचा परिरात खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय असून पंजाबी गॅरेजजवळ त्या हातगाडी लावून आपला व्यवसाय सांभाळतात.
सोमवारी (दि.२३) दोघा संशयितांनी बलसाने व गॅरेजचालक यांचे आर्थिक नुकसान व्हावे या उद्देशाने दोन्ही दुकानांवर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून दिले. स्थानिकांच्या ही बाब निदर्शनास आल्याने सर्वांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र दुकानातील माल जळून खाक झाला. दोन्ही व्यावसायीकांचे यात मोठे नुकसान झाले असून संशयितास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
सिडकोतील कामटवाडा भागात घरफोडी…४५ हजाराचा ऐवज केला लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सिडकोतील कामटवाडा भागात भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी सुमारे ४५ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. त्यात रोकडसह सोन्याच्या अंगठीचा समावेश आहे. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छोटू ओमकार पाटील (रा.शांतीपार्क रो हाऊस,गोपालनगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पाटील कुटूंबिय रविवारी (दि. २२) सायंकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यानी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड व सोन्याची अंगठी असा सुमारे ४५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास पोलिस नाईक बनतोडे करीत आहेत.