नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – त्र्यंबकरोडवरील गोल्फ क्लब मैदान भागात २५ वर्षीय तरूणाने दोघा अल्पवयीन मैत्रीणींचा विनयभंग केल्याची घटना घडली. पाठलाग करून मोबाईलवर व्हिडीओ बनविल्याचा जाब विचारल्याने हा प्रकार घडला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात विनयभंगासह पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस संशयिताचा शोध घेत आहेत.
पाथर्डी फाटा भागात राहणा-या १७ वर्षीय पीडितेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पीडिता व तिची मैत्रीण सोमवारी (दि.२३) गोल्फ क्लब मैदान भागात गेली होती. रस्त्याने पायी जात असतांना अंबड येथील दत्तनगर भागात राहणा-या २५ वर्षीय अनोळखी युवकाने दोघींचा पाठलाग केला.
यावेळी त्याने पुढे चालणा-या दोघी मैत्रीणींचा मोबाईलवर व्हिडीओ काढला. ही बाब मुलींच्या निदर्शनास येताच त्यांनी त्यास जाब विचारला असता ही घटना घडली. संतप्त युवकाने शिवीगाळ व दमदाटी करीत दोघींचा विनयभंग केला. अधिक तपास उपनिरीक्षक गोडे करीत आहेत.