नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भरदिवसा घरफोडीत चोरट्यांनी सुमारे अडीच लाखाचा ऐवज लंपास केल्याची घटना उपनगर येथील शांतीपार्क भागात घडली. या घरफोडीत चोरटयांनी रोकडसह सोन्याचांदीचे व प्लॅटीनमचे दागिणे तसेच घड्याळ चोरुन नेले. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विवेक रमेश निकम (रा.सागरीका सोसा.शांतीपार्क) यांनी तक्रार दाखल केली आहे. निकम कुटूंबिय शुक्रवारी (दि.२०) सकाळच्या सुमारास अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून ही चोरी केली. घरात शिरलेल्या चोरट्यांनी बेडरूममधील कपाटात ठेवलेली रोकड,घड्याळ व सोन्याचांदी आणि प्लॅटीनमचे दागिणे असा सुमारे २ लाख ६६ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक प्रविण चौधरी करीत आहेत.
गुटखा विक्री करणा-या पानस्टॉलचालक विरुध्द कारवाई
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) आनंदवली भागात राजरोस गुटखा विक्री करणा-या पानस्टॉल चालक विरोधात शुक्रवारी (दि.२०) अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत अडिच हजाराचा गुटखा पथकाच्या हाती लागला असून, याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राकेश मुकूंदा ब्राम्हणकर (रा.ध्रुवनगर,गंगापूर शिवार) असे कारवाई करण्यात आलेल्या संशयित पानस्टॉल चालकाचे नाव आहे. ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी अमित रासकर यांच्या पथकाने केली. आनंदवली येथील रॉयल बेकर्स शेजारील समर्थ पान शॉप येथे गुटख्याची राजरोस विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार पथकाने शुक्रवारी (दि.२०) सायंकाळी छापा टाकला असता टपरीत सुमारे २ हजार ५९१ रूपये किमतीचे विमल व राजनिवास पानसुपारी आणि सुगंधी तंबाखूचे पुडे मिळून आले. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten
…….