नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – तेलंगवाडीसह पेठरोडवरील लक्ष्मणनगर भागात गुरूवारी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पंचवटी पोलिसांनी हातभट्टीची गावठी दारु विक्रेत्यांवर संयुक्त कारवाईत महिलेसह एकाला गजाआड केले आहे. त्यांच्या ताब्यातून ६७० लिटर गावठी दारूसह सुमारे ४६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही दारू घोटी – इगतपुरी येथून येत असल्याचे बोलले जात आहेत. यंकुबाई कैलास जाधव व राहूल दिपक गुंजाळ (रा.लक्ष्मणनगर) अशी अटक केलेल्या संशयित मद्यविक्रेत्यांची नावे आहेत.
पंचवटीतील तेलंगवाडी,पेठरोड व लक्ष्मण नगर भागात राजरोसपणे हातभट्टीची दारू विक्री होत असल्याची माहिती एक्साईज विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय उपायुक्त बा.ह.तडवी व अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अ विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर यांच्या पथकाने पंचवटी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक पडोळकर यांच्या बंदोबस्तात दिवसभर छापे मारी केली. यावेळी तेलंगवाडी व लक्ष्मणनगर येथे संशयित मद्यविक्री करतांना मिळून आले.
संशयित महिलेसह राहूल गुंजाळ या मद्यविक्रेत्यास बेड्या ठोकत पथकांनी दोघांच्या ताब्यातून ६७० लीटर गावठी दारूने भरलेले चार प्लॅस्टीकचे ड्रम, ११ प्लॅस्टीकच्या कॅन व एक मोबाईल असा सुमारे ४५ हजार ८५० रूपयांचा ऐवज हस्तगत केला ही कारवाई निरीक्षक योगेश सावखेडकर यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील,भावना भिरड,सहाय्यक दुय्यम निरीक्षक मायकल पंडीत जवान विरेंद्र वाघ,राहूल जगताप,विजय पवार व गणेश वाघ आदींच्या पथकाने केली. या कारवाईस पंचवटे सहाय्यक निरीक्षक पडोळकर,हवालदार चव्हाण,सानप पोलिस नाईक काकुळते तसेच गुन्हे शोध पथकाने मदत केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten