नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गंजमाळ परिसरातील पंचशिलननगर भागात गुटख्याची राजरोस विक्री करणा-या दुकानदारास पोलिसांनी गजाआड केले. नितीन रघूनाथ येवले (४१ रा.पंचशिलनगर,गंजमाळ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित दुकानदाराचे नाव आहे. या कारवाईत सुमारे ३० हजार रूपये किमतीचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची गंजमाळ भागात राजरोसपणे विक्री होत असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सोमवारी (दि.१६) पथकाने ग्राहक पाठवून खात्री केली असता ही कारवाई करण्यात आली. बनावट ग्राहकाने गुटख्याची विक्री होत असल्याबाबत इशारा करताच पोलिसांनी संजय ट्रेडर्स किराणा दुकानावर छापा टाकला असता संशयित गुटख्याची बेकायदा विक्री करतांना मिळून आला.
त्याच्या दुकानातून २८ हजार ४७० रूपये किमतीचा विविध कंपनीचा पान मसाला आणि सुगंधी तंबाखूचे पुडे हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी हवालदार नरेंद्र जाधव यांनी फिर्याद दिल्याने पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक पवार करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten