नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) –विशेष मुख्त्यारपत्रात खाडाखोड करून कवडीमोल दरात शेतजमिनीची खरेदी केल्याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञानाचा फायदा उचलत मिळकत गिळंकृत करण्याच्या उद्देशाने ही फसवणुक करण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश वामन गायकवाड (रा.भगवंत पार्क दत्तमंदिर समोर,गायकवाडमळा) असे दस्तऐवजात खाडाखोड करून खरेदीखत नोंदविणा-या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी अंबादास रामभाऊ औटे (५६ रा.औटेमळा,जयभवानीरोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. औटे कुटूंबियांच्या मालकिच्या मौजे देवळाली शिवारातील शेतजमिनीचा व्यवहार संशयित गायकवाड यांनी केला होता.
२००४ मध्ये झालेल्या या व्यवहारात संशयितास विशेष मुख्त्यारपत्र करून देण्यात आले होते. मात्र संशयिताने औटे कुटुंबियांच्या अज्ञानाचा फायदा उचलत मुक्त्यारपत्रातील ठरलेल्या रकमेत खाडाखोड करून स्व:ताच्या लाभात ५० लाख रूपयांस दर्शविले आणि कवडीमोल भावात खरेदी करून घेतली. याबाबत नाशिकरोड व नाशिक येथील सह दुय्यम निंबधक कार्यालय क्रमांक ६ मध्ये नोंदणी करण्यात आली. ही बाब निदर्शनास येताच औटे यांनी पोलिसात धाव घेतली असून औटे कुटुंबियांची मिळकत गिळंकृत करण्याच्या प्रयत्न करून कुटुंबियांची आर्थिक फसवणुक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक मन्सुरी करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten