नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सायबर पोलिस ठाण्यात घरबसल्या कामाचे आमिष दाखवून साडे सात लाख रूपयांना गंडा घातल्याप्रकरणी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाईन रोकड भरण्यास भाग पाडून ही फसवणुक करण्यात आली आहे. मच्छींद्र ज्ञानेश्वर संधान (३६ रा.श्रीजी श्रीरंग अपा.सयाजी हॉटेलजवळ,इंदिरानगर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
संधान गेल्या ऑगष्ट महिन्यात इंटरनेटवर घरबसल्या कामाचा शोध घेत असतांना ९९८२०७१६०० या व्हॉटसअप क्रमांकधारकाने त्यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी त्यांना घरबसल्या कामाची माहिती देण्यात आली. संधान यांचा विश्वास संपादन करून भामट्यांनी त्यांना कामाबरोबरच या व्यवसायात गुंतवणुक केल्यास जास्तीचा मोबदला मिळेल असे आमिष दाखविल्याने ही फसवणुक झाली.
दि.१९ ते २१ ऑगष्ट दरम्यान त्यांना यु स्माल फायनान्स, येस बँक, पंजाब नॅशनल बँक व युपीआय आणि टेलीग्राम आयडीच्या माध्यमातून तब्बल ७ लाख ४७ हजार ७७९ रूपयांची गुंतवणुक करण्यास भाग पाडण्यात आले. एक दीड महिना उलटूनही काम अथवा गुंतवणुकीचा मोबदला न मिळाल्याने संधान यांनी संशयितांशी संपर्क साधला मात्र तो होवू न शकल्याने फसवणुक झाल्याचे लक्षात येताच संधान यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten