अपघाताची मालिका सुरूच; वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर व परिसरात वेगवेगळया ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. मालवाहू ढम्परच्या धडकेत अनोळखीचा तर बुलेटच्या धडकेत ५८ वर्षीय पादचाराच्या मृत्यू झाला. याबाबत नाशिकरोड आणि सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताची व मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिला अपघात त्र्यंबकरोडवर झाला. या अपघातात राजेंद्र भाऊसाहेब घोडके (५८ रा.मायको हॉस्पिटल जवळ,स्वारबाबानगर) यांचा मृत्यू झाला. घोडके दाम्पत्य गेल्या गुरूवारी (दि.५) मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली होती. सातपूर गावाकडून सकाळ सर्कलच्या दिशेने दांम्पत्य पायी जात असतांना पोलिस ठाणे परिसरातील सेल पेट्रोल पंपासमोर भरधाव बुलेटने राजेंद्र घोडके यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. कराड हॉस्पिटल मध्ये प्रथमोपचार करून त्यांना अधिक उपचारार्थ मॅग्नम हॉस्पिटल येथे दाखल केले असता मंगळवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक गायकवाड करीत आहेत.
दुसरा अपघात जेलरोड भागात झाला. भरधाव वेगातील मालवाहू डम्परने धडक दिली. या अपघातात अनोळखी इसमाचा मृत्यू झाला. नवलेचाळ समोरील पुलाखाली सोमवारी (दि.९) रात्री हा अपघात झाला. याप्रकरणी जमादार रतन जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाहनचालक संजय गिरीधर मुफेकर (रा.शिंदेगाव) याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक माळी करीत आहेत.
तडिपारास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -शहरात वावर ठेवणा-या तडिपारास पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई गोदाघाटावरील शितळा देवी मंदिर परिसरात करण्यात आली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सनी सोमनाथ दोडके (२२ रा.काझीगढी जुने नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तडिपाराचे नाव आहे. दोडके याच्या गुन्हेगारी कारवायांमुळे त्याच्या विरोधात एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. शहर व जिह्यातून तडिपार केलेले असतांना त्याचा वावर शहरातच होता.
पोलिस त्याच्या मागावर असतांनाच भद्रकाली पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी (दि.१०) दुपारच्या सुमारास गोदाघाटावरील शितळा मंदिर परिसरात पोलिसांनी सापळा लावून त्यास जेरबंद केले. याबाबत पोलिस नाईक कय्युमअली सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस नाईक साळुंके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten