नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील शेरे पंजाब हॉटेल भागात भरधाव मोटारसायकल दुभाजकावर आदळल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. अंकुश प्रभाकर देवरे (३२ रा.बालाजी चौक,कोनार्क नगर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवरे गुरूवारी दुपारच्या सुमारास ओझरकडून नाशिकच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. महामार्गावरील शेरे पंजाब हॉटेल समोर भरधाव दुचाकी दुभाजकावर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला होता. स्थानिकांनी त्यास तात्काळ नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत डॉ.वैशाली बनकर यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.
३७ वर्षीची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ३७ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सारडा सर्कल परिसरातील खोतमळा भागात घडली. दिपक मुरलीधर विघे (रा.हिरो होंडा शोरूम जवळ खोतमळा) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दिपकच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिपक विघे यांनी गुरूवारी (दि.५) आपल्या राहत्या घरात लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत घरमालक मंगेश मते यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक मगर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten