नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुंबई येथील ट्रव्हल्सची कार चालविणा-या चालकास एका प्रवासी महिलेने ९० हजाराचा गंडा घातला आहे. अल्पावधीसाठी मोबाईल घेत तसेच क्रेडिट कार्डची चोरी करीत भामट्या महिलेने परस्पर हे पैसे लंपास केले. अल्पशा कामानिमित्त कारमधून उतरलेली महिला बराच वेळ उलटूनही न परतल्याने आपली फसवणूक झाल्याचे कार चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
या फसवणूक प्रकरणी नवी मुंबई येथील राहुल अशोक पवार यांनी तक्रार दाखल केली आहे. कार चालक पवार गेल्या गुरूवारी (दि.२७) मुंबई येथून एका प्रवासी महिलेस घेवून नाशकात आले होते. नवी मुंबई येथून सदर महिलेने पुणे आणि नाशिक जावयाचे आहे, असे सांगून कार भाडे तत्वावर घेतली होती. ट्रव्हल्स एजन्सीच्या माध्यमातून सदर महिलेने कार बुक केली होती. चालक पवार व सदर महिला सायंकाळी पुणे येथून नाशकात दाखल झाले होते. सराफ बाजारात पैसे घ्यावयाचे आहे, असे सांगून महिलेने रविवार कारंजा भागातील प्रकाश सुपारीवाला दुकानासमोर कार थांबवून ती निघून गेली. त्यानंतर हातात एक धनादेश घेऊन ती परतली होती.
त्यानंतर मोबाईलची बॅटरी संपली आहे. असा बहाणा करीत चालकाचा मोबाईल घेतला. मोबाईल घेऊन संशयित महिला पैसे आणण्यासाठी पुन्हा निघून गेली. बराच वेळ झाला महिला परतली नाही. चालकास संशय आल्याने त्याने चारचाकीत ठेवलेले मित्राचे क्रेडिट कार्डची तपासणी केली. कार्ड मिळून आले नाही. महिलेने दहा-दहा हजार करून सुमारे ९० हजारांची रक्कम परस्पर क्रेडिट कार्डच्या माध्यमातून काढून घेतली. शिवाय, चालकाचा मोबाईलही घेऊन गेली. चालकाने मित्र आणि कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर चालक पवार याने मंगळवारी पुन्हा नाशिक गाठून पोलिसात तक्रार दाखल केली असून अधिक तपास पोलिस नाईक बाविस्कर करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten