नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – टाकळीरोडवरील एचडीएफसी बँकेजवळ नाशिकसह राज्यातील विविध महापालिकांमध्ये बांधकाम आणि अन्य कामे घेणा-या ठेकेदाराच्या कारमधून रोकडसह पिस्तूल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चोरीप्रकरणी सुजीत रमेशचंद्र जिरापुरे (रा.समिर बंगला,धवलगिरी सोसा.टाकळीरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जिरापुरे हे शासकिय ठेकेदार असून त्यांची नाशिकसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे सुरू आहेत. जिरापुरे यांनी आपली ऑडी कार सोमवारी (दि.१) दुपारच्या सुमारास बंगल्यासमोर पार्क केलेली असतांना ही घटना घडली.
अज्ञात चोरट्यांनी कारचा ड्रायव्हर साईडचा दरवाजा कशाने तरी उघडून ही चोरी केली. दरवाजात लटकवलेली जर्मन बनावटीचे आरमीनी एस कंपनीचा पिस्तूल व पाकिट चोरट्यांनी चोरून नेले. या पाकिटात रोकड होती. या घटनेत पिस्तूलसह रोकड असा सुमारे ८० हजाराचा ऐवज चोरीस गेल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.