नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विमा कंपनीच्या बंद पडलेल्या पॉलिसीचे पैसे मिळवून देण्याचे आमिष दाखवून एका उद्योजकाला तब्बल २३ लाख ७० हजार ६३५ रुपयाला गंडा घातल्याचे समोर आले आहे. याबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लघू उद्योग असलेल्या उद्योजकाने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गेल्या वर्षी १३ डिसेंबर ते ९ सप्टेंबर दरम्यान भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. उद्योजकाने भारतीय एक्सा आणि इंडिया फस्ट या विमा कंपन्याच्या पॉलिसी घेतल्या आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांचे हप्ते भरले गेले नाही त्यामुळे त्या बंद अवस्थेत आहेत. याची माहिती घेत भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधून बंद पॉलिसींच्या माध्यमातून कोट्यावधींची रक्कम मिळेल असे आश्वासन दिले. त्यामुळे उद्योजकाचा विश्वास बसला.
या बंद पॉलिसीचे पैसे परत मिळवून देतो अशी ग्वाही देत भामट्यांनी त्यांना या ना त्या कारणाने पैसे भरण्यास भाग पाडले. उद्योजकाने बँक व वॉलेट खाते आणि टेलिग्रामच्या माध्यमातून तब्बल २३ लाख ७० हजार ६३५ रूपये भरले असून अनेक महिने उलटूनही विमा कंपनीकडून पैसे न मिळाल्याने फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पोलिसात धाव घेतली आहे.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten