नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– हॉटेलच्या स्टॉफ रूममध्ये चार्जिगला लावलेला मोबाईल चोरी केल्याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली आहे. वकिलवाडीतील हॉटेल पंचवटी येथे हा प्रकार घडला असून याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल साहेबराव डेरे (२५ रा. वाळूंज एमआयडीसी,संभाजीनगर) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. याबाबत दिपचंदसिंग हलकुसिंग मराबी (मुळ रा. जबलपूर,मध्यप्रदेश हल्ली पंचवटी हॉटेल,वकिलवाडी) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
मराबी हॉटेल पंचवटी येथे नोकरीस असून मंगळवारी (दि.५) त्यांनी स्टाफरूममध्ये आपला मोबाईल चार्जिंगला लावला असता ही घटना घडली. स्टाफरूममध्ये कोणी नसल्याची संधी साधत संशयिताने मोबाईल चोरला होता. मोबाईल चोरीस गेल्याची बाब समोर येताच पोलिसांना पाचारण केले असता चोरटा संशयित हाती लागला. हॉटेल मधील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे संशयितास अटक करण्यात आली असून अधिक तपास हवालदार जाधव करीत आहेत.
दोघा भावांना चार जणांच्या टोळक्याने केली बेदम मारहाण
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- नांदूरनाका भागात दोघा भावांना चार जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत वाद मिटविण्यासाठी गेलेल्या भावास काही तरी हत्याराने मारहाण करण्यात आल्याने तो जखमी झाला असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
करण संतोष जगताप,दर्शन संतोष जगताप,सोपान बागुल (रा.तिघे नांदूरनाका) व दादू गांगुर्डे (रा.दसक राजवाडा शेजारी जेलरोड) अशी दोघा भावांना चोप देणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी रोहित बबन तुपलोंढे (२२ रा.साई बाबा मंदिराजवळ,संत जनार्दननगर नांदूरनाका) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. रविवारी (दि.३) रात्री साईबाबा मंदिर परिसरात ही घटना घडली.
संशयित टोळक्याने तुपलोंढे याच्या भावास गाठून मारहाण केली. यावेळी तो वाद मिटविण्यासाठी गेला असता संतप्त टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत संशयितांपैकी एकाने काही तरी हत्याराने वार केल्याने रोहित जखमी झाला असून अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
कोयता घेवून फिरणा-या तरूणास पोलिसांनी केले गजाआड
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- हनुमानवाडीतील मोरेमळा भागात दहशत माजविण्यासाठी धारदार कोयता घेवून फिरणा-या तरूणास पोलिसांनी बेड्या ठोकल्या. संशयिताच्या ताब्यातून लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निलेश नंदू रणमाळे (२७ रा.श्रीकृष्णनगर,हनुमानवाडी) असे अटक करण्यात आलेल्या कोयताधारीचे नाव आहे. रणमाळे मंगळवारी (दि.५) आपल्या घर परिसरातील मारूती मंदिर भागात कोयत्याचा धाक दाखवित दहशत माजवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने धाव घेत त्याच्या मुसक्या आवळल्या असता त्याच्या अंगझडतीत धारदार कोयता मिळून आला. संशयिताच्या ताब्यातून कोयता हस्तगत करण्यात आला असून याबाबत अंमलदार महेश खांडबहाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस नाईक लोणारे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten