नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहरात मालवाहू टेम्पोसह वेगवेगळया भागात पार्क केलेल्या तीन मोटारसायकली चोरट्यांनी नुकत्याच चोरून नेल्या. याप्रकरणी अंबड, पचवटी,गंगापूर व मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड लिंकरोड भागात राहणारे वैभव गोविंद साळवे (रा.म्हाडा कॉलनी,रिंगालीया कॉम्प्लेक्स समोर,अंबड लिंकरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार साळवे यांच्या मालकिचा सुमारे साडे तीन लाख रूपये किमतीचा अशोक लेलंड दोस्त एमएच १७ बीवाय ०५७८ हा मालवाहू टेम्पो सोमवारी (दि.४) त्यांच्या घरासमोर पार्क केलेला असतांना तो चोरट्यांनी पळवून नेला. याबाबत अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
मोटारसायकल चोरीची पहिली घटना संभाजी चौकात घडली. चेतन रविंद्र माळी (रा.एनआरएच बिल्डींग,संभाजी चौक) या युवकाने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. माळी याची शाईन मोटारसायकल एमएच १५ जीजी ३६२४ रविवारी त्यांच्या बिल्डींगच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शिंदे करीत आहेत.
दुसरी घटना गोदाघाटावर घडली. सुमित विजय गरगटे (रा.ओझर ता.निफाड) हे रविवारी (दि.३) गोदाघाटावर आले होते. रामकुंड परिसरातील कपालेश्वर मंदिरासमोरील पांडे मिठाई भागात त्यांनी एमएच १५ ईयू ९३७५ ही स्प्लेंडर दुचाकी पार्क केली असता ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाडेकर करीत आहेत.
तिसरी घटना महात्मानगर येथे घडली. विश्वजीत राजेंद्र श्रीखंडे (रा.श्रीमंगल अपा.एबीबी सर्कल जवळ महात्मानगर) यांची स्प्लेंडर एमएच २० बीडी ४६६८ रविवारी (दि.३) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार सहाणे करीत आहेत.