नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– चारचाकी वाहनांच्या काचा फोडणा-या चार जणांना पोलिसांनी गजाआड केले आहे. ध्रुवनगर भागात धुमाकूळ घालत या तरुणांनी किरकोळ कारणातून हे कृत्य केले. याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय गोपाळ जाधव (२३), गौरव संजय जाधव (२०), दर्शन दीपक साळवे (२०) व सखाराम बापू काकडे (२३ रा.सर्व ध्रुव नगर ) अशी संशयितांची नावे आहेत. सोमवारी (दि.४) मध्यरात्री ही घटना घडली होती. संशयितांनी किरकोळ कारणातून झालेल्या वादाच्या रागातून घरासमोर पार्क केलेल्या तीन चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले होते. याप्रकरणी अंमलदार मच्छिंद्र वाघचौरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांनी घटनास्थळी भेट देत दिवसभर शिवाजीनगर चौकी येथे तळ ठोकत आरोपी निष्पन्न करण्यासह त्यांना अटक करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यामुळे गंगापूर पोलिस व गुन्हे शोध पथक कामाला लागले होते. डीबीचे हवालदार गिरीश महाले यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांना हुडकून काढले असून ही कारवाई हवालदार रवींद्र मोहिते, पोलिस नाईक परदेशी, अंमलदार सोनू खाडे, मच्छिंद्र वाघचौरे, साळुंखे, थविल आदींच्या पथकाने केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten