नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- शहर परिसरात वेगवेगळया भागात नुकत्याच झालेल्या अपघांतामध्ये चौघांचा मृत्यू झाला. त्यात तीन पादचा-यासह एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे. याप्रकरणी आडगाव व अंबड पोलिस ठाण्यात अपघाताची तर नाशिकरोड आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पहिली घटना महामार्गावरील सुमन पेट्रोल पंप भागात झाली. अल्को मार्केट भागातील निवृत्ती दादाभाऊ घाटेसाव (३८ रा.भगतसिंगनगर,अल्को मार्केट इंदिरानगर) हे शनिवारी (दि.२) रात्री महामार्गावरील सुमन पेट्रोल पंप परिसरातून रस्त्याने पायी जात असतांना सर्व्हीस रोडने भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने भाऊ प्रदिप घाटेसाव यांनी त्यांना तात्काळ जिल्हारूग्णालया मार्फे त आडगाव मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.वृषभ आडके यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. याबाबत डॉ.आर.जे.शिराळे यांनी दिलेल्या खबरीवरून इंदिरानगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक हादगे करीत आहेत.
दुस-या घटनेत नांदूरनाका भागात राहणारे भाऊसाहेब उध्दव साळुंके (३१ मुळ रा. गोलटगाव ता.जि.संभाजीनगर हल्ली जनार्दननगर,नांदूरनाका) हे गेल्या २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास नांदूरनाक्याकडून जेलरोडच्या दिशेने पायी जात असतांना संत जनार्दन स्वामी पुल परिसरात त्यांना पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच १४ केएस ९९७५ या कारने जोरदार धडक दिली होती. या अपघातात साळुंके यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संतोष सराटे (रा.मखमलाबाद) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात कारचालकाविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हवालदार देसाई करीत आहेत.
तिसरा अपघात महामार्गावरील पाथर्डी शिवारात झाला. अनुशा हॉटेल समोरील सर्व्हीस रोड ओलांडणाºया ४५ वर्षीय अनोळखी इसमास मुंबईकडून मालेगावच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर व्यक्ती फिरस्ता असल्याचे बोलले जात असून हा अपघात गेल्या गुरूवारी (दि.३०) सायंकाळच्या सुमारास झाला. याबाबत पोलिस कर्मचारी पंकज शिरवले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक आवारे करीत आहेत.
चौथा अपघात सिन्नरफाटा भागात झाला. सामनगाव येथील गंगाधर रूंजा जाधव (६० रा.जाधव वस्ती साडेगाव) हे रविवारी (दि.३) दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकीने सामनगावच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. नवीन सामनगाव रोडने ते जात असतांना गावठाण वृध्दाश्रमाजवळ अचानक डुक्कर आडवे आल्याने ते पडले होते. या घटनेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने मुलगा पप्पू जाधव याने त्यांना तातडीने साई केअर हॉस्पिटल येथे दाखल केले असता सायंकाळी उपचार सुरू असतांना वैद्यकीय सुत्रांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक ठेपणे करीत आहेत.
२३ वर्षीय परप्रांतीय तरूणाची आत्महत्या
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- २३ वर्षीय परप्रांतीय तरूणाने आपल्या राहत्या रूममध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना आनंदवली भागात घडली. भाडेतत्वावर राहणा-या तरुणाने केलेल्या या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शक्तीकुमार सुरेंद्र यादव (२३ रा.परिक्षीत जाधव यांच्या खोलीत आनंदवली,गंगापूररोड) असे मृत युवकाचे नाव आहे. यादव याने रविवारी (दि.३) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या खोलीमध्ये पंख्याच्या हुकास ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच घरमालक परिक्षीत जाधव यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार झिरवाळ करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten