नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील अपघाताचे सत्र सुरुच असून वेगवेगळया भागात झालेल्या अपघातामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. आडगाव व अंबड पोलिस ठाण्यात याबाबत मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिला अपघात औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे शिवारात झाला. अमिन बाबुलाल शेख (२७ रा.बजरंगवाडी,विल्होळी) हा युवक मंगळवारी औद्योगीक वसाहतीतील चुंचाळे भागातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दाजी शब्बीर पठाण यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ.एस.डी.मोरे यांनी त्यास तपासून मृत घोषीत केले. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.
दुस-या अपघातात नांदूरनाका भागातील उध्दव भाऊसाहेब साळुंखे (३१ रा.जनार्दननगर) हे सोमवारी (दि.२७) नांदुरनाक्याकडून नाशिकरोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. दसक पुलावर भरधाव अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिल्याने साळुंखे गंभीर जखमी झाले होते. कुटूंबियांनी त्यांना गोविंदनगर येथील पाणेशिया हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना मंगळवारी डॉ. स्वप्नील जाधव यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत डॉ. दिपाली केदार यांनी खबर दिल्याने आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार डापसे करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten