नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड येथे भावजयी बरोबर खरेदीसाठी रस्त्याने पायी जाणा-या पुणे येथील महिलेच्या गळयातील सोन्याची पोत दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना घडली. या घटनेत सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत भामट्यांनी लांबविली असून याप्रकरणी पोलिस दप्तरी जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सारिका रामदास निसासळ (रा.भोसरी पुणे) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. निसासळ या दिवाळी निमित्त माहेरी आल्या होत्या. शुक्रवारी (दि.२४) दुपारी त्या भावजयी सुरेखा नागरगोजे यांच्या समवेत खरेदीसाठी नाशिकरोड भागात गेल्या असता ही घटना घडली.
दोघी महिला सिन्नर फाट्याकडून रस्त्याने पायी जात असतांना शिवाजी पुतळा येथील जुन्यापुलावर विरूध्द दिशेने आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने त्यांच्या गळयातील सुमारे ५० हजार रूपये किमतीची सोन्याची पोत ओरबाडून पोबारा केला. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.