बोलण्यात गुंतवून भाजीपाला विक्रेता महिलेचे ५६ हजाराचे दागिणे चोरट्याने केले लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- गुजरी गल्लीत बोलण्यात गुंतवून भाजीपाला विक्रेता महिलेस एकाने अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला देत मदतीच्या बहाण्याने दागिणे हातोहात लांबविल्याची घटना घडली. या घटनेत रोकडसह सुमारे ५६ हजार रूपये किमतीचे दागिणे भामट्याने लांबविले असून याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कौशाबाई पांडूरंग गोरे (रा. दारणानगर,पळसे ता.जि.नाशिक) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गोरे या बुधवारी (दि.२२) भाजीपाला विक्री करण्यासाठी नाशिकरोड भागात आल्या होत्या. शिवाजी महाराज पुतळया समोरील गुजरी गल्लीत त्या भाजीपाला विक्री करीत असतांना भामट्याने त्यांना गाठले. भाजीपाला खरेदीच्या बहाण्याने आलेल्या भामट्याने गोरे यांना बोलण्यात गुंतवून हा डल्ला मारला.
वृध्दांना मोफत शिधा मिळत असल्याची बतावणी करीत संशयिताने गोरे यांनी अंगावरील अलंकार काढून ठेवण्याचा सल्ला दिली.
यावेळी त्याने मदतीचा बहाणा करून गोरे यांच्या ताब्यातील रोकड व दागिणे असा सुमारे ५६ हजाराचा ऐवज हातोहात लांबविला. सदर इसम निघून गेल्यानंतर ही बाब निदर्शनास आल्याने गोरे यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
गर्दीची संधी साधत मेनरोडवर खरेदीसाठी आलेल्या महिलेची पर्स चोरटयांनी केली लंपास
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मेनरोड भागात खरेदीसाठी आलेल्या सुरगाण्याच्या महिलेच्या पर्समधील पाकिट चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. गर्दीची संधी साधत चोरट्यांनी पर्सची चैन उघडून ही चोरी केली असून, यात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे ४३ हजाराचा ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रूकसाना सलमान मनियार (रा.तेली गल्ली,सुरगाणा) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मनियार या बुधवारी (दि.२२) खरेदीसाठी शहरात आल्या होत्या. शालिमार कडून मेनरोडच्या दिशने त्या खरेदीसाठी फिरत असतांना ही घटना घडली.
गर्दीतून त्या खरेदी करीत असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या खांद्याला अडकविलेल्या पर्सची चैन उघडून पैश्यांचे पाकिट हातोहात लांबविले. या पाकिटात रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे,एटीएम व आधार कार्ड असा सुमारे ४३ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार ढमाले करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten