नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकमध्ये एकास ४४ लाखास गंडा घातल्याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकीच्या बहाण्याने ही फसवणूक करण्यात आली आहे. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून तसेच वेगवेगळया बँक खात्यात गुंतवणुकीची रक्कम भरण्यास भाग पाडून हे पैसे भामट्याने लंपास केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिलींद तीर्थराज पाटील (रा.त्रिमुर्ती नगर,जेलरोड) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. पाटील गेल्या महिन्यात गुंतवणुकीसाठी इंटरनेटवर ट्रेंडिगचा शोध घेत असतांना व्हॉटसअप आणि टेलीग्रामच्या माध्यमातून भामट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. क्रिप्टो करन्सी ट्रेडींगमध्ये गुंतवणुक केल्यास मोठ्या परतावा देऊ असे आमिष दाखविण्यात आल्याने पाटील यांचा विश्वास बसला. त्यानंतर भामट्यांनी त्यांना आयसीआयसीआय बँकचे वेगवेगळया खात्यांमध्ये गुंतवणुकीची रक्कम भरणा करण्यास भाग पाडले.
२९ ऑक्टोबर ते १ नोव्हेबर दरम्यानच्या तीन दिवसात पाटील यांनी ४३ लाख २२ हजार ९५० रूपयांची गुंतवणुक केली. मात्र २० दिवस उलटूनही परतावा अथवा गुंतवणुकीची रक्कम पाटील यांच्या पदरी न पडल्याने त्यांनी भामट्यांशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही. त्यामुळे फसवणुक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक शेख करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten