नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अमृतधाम भागात पत्ता विचारण्याचा बहाणा करून वृध्दाच्या गळ्यातील सुमारे ७५ हजाराची सोनसाखळी कारमधील त्रिकुटाने हातोहात लांबविल्याची घटना घडली. बोलण्यात गुंतवून वृध्दास सोनसाखळी काढण्यास भाग पाडून भामट्यांनी चैन पळविली असून याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात ठकबाजीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवृत्ती लक्ष्मण नारखेडे (वय ७६) यांनी फिर्याद दिली आहे. नारखेडे शुक्रवारी (दि.१०) सायंकाळच्या सुमारास पाय मोकळे करण्यासाठी घराबाहेर पडले होते. अमृतधामकडून ते बिडीकामगार नगरच्या दिशेने पायी जात असतांना ही घटना घडली. अॅटलांटीक बिल्डींगजवळून ते पायी जात असतांना पाठीमागून कारमधून आलेल्या भामट्यांनी त्यांच्याकडे पत्ता विचारण्याचा बहाणा केला. यावेळी कारजवळ नारखेडे यांना बोलावून घेत भामट्यांनी त्यांना बोलण्यात गुंतविले. यावेळी संशयितांनी सोन्याचे दागिणे सांभाळण्याचा सल्ला देत सुमारे ७५ हजार रूपये किमतीची सोनसाखळी हातचलाखीने लांबवून पोबारा केला. अधिक तपास, हवालदार सोनवणे करीत आहेत.
लॅपटॉप व मोबाईल चोरून नेले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उघड्या घरात शिरून चोरट्यांनी लॅपटॉप व मोबाईल चोरून नेल्याची घटना औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश मधुकर जोगदंड (वय २२) यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली आहे. जोगदंड कुटूबिय गुरूवारी (दि.९) दिपावलीच्या कामात व्यस्त असतांना अज्ञात चोरट्यांनी उघड्या घरात शिरून ही चोरी केली. घरात शिरलेल्या भामट्यांनी टेबलावर ठेवलेला लॅपटॉप आणि मोबाईल असा सुमारे २५ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास जमादार भड करीत आहेत.
२० वर्षीय तरूणाने जीवन संपवले
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकरोड परिसरातील २० वर्षीय तरूणाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली. सदर युवकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदित्य ज्ञानेश्वर गिते (रा.मुक्तीधाम मागे.आनंदनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. गिते याने गेल्या रविवारी (दि.५) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात विषारी औषध सेवन केले होते. ही बाब निदर्शनास येताच बहिण अश्विदा गिते हिने त्यास तात्काळ बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना शुक्रवारी वैद्यकीय सुत्रांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक बोडके करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten