नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी वेगवेगळया भागात छापेमारी करीत चार गुटखा विक्रेत्यांवर कारवाई केली. या कारवाईत दोघांना अटक करीत पथकांनी सुमारे ३३ हजार रूपये किमतीचा सुगंधी सुपारी आणि तंबाखूचा साठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी सरकारवाडा,गंगापूर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली कारवाई सिन्नरफाटा भागात करण्यात आली. एकलहरा रोडवरील बैठक पान स्टॉल येथे गुटखा विक्री होत असल्याच्या माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकला असता गजानन साहेबराव थोरात (३९ रा.एकलहरेरोड) हा संशयित गुटख्याची विक्री करतांना मिळून आला. संशयितास अटक करीत पथकाने या ठिकाणाहून सुमारे ९ हजार १०६ रूपये किमतीची सुगंधी तंबाखू आणि पान मसाला असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी सायली पटवर्धन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक आडके करीत आहेत.
दुसरी कारवाई कॉलेजरोडवरील गोदावरी कॉलनीत असलेल्या एका पानस्टॉलवर केली. प्रतिबंधीत गुटख्याची विक्री होत असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार बुधवारी सायंकाळच्या सुमारास मातोश्री पान स्टॉल येथे छापा टाकला असता विशाल सदाशिव वराडे (रा. गोदावरी कॉलनी कॉलेजरोड) हा बेकायदा गुटखा विक्री करतांना मिळून आला. त्याच्या पानस्टॉलमध्ये सुमारे ३ हजार ७९६ रूपये किमतीचा गुटखा मिळून आला असून याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिस टाण्यात गुन्हा दाखल करण्यात येवून संशयितास अटक करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
तिसरी कारवाई याच भागातील नंदन दुग्धालय भागात करण्यात आली. दौलत सोसायटीतील मे.स्मोकिंग किल्स या दुकानाच्या शॉपवर टाकलेल्या छाप्यात सुमारे १९ हजार ६७५ रूपये किमतीचा बेकायदा मिळून आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी उमेश सुर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दुकान मालक पंकज हेमंत सबलानी (रा.काठेगल्ली,द्वारका) व मेहमुब अली राज्जब अली (२७ मुळ रा.उत्तरप्रदेश) या दोघांविरूध्द गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक बैसाणे करीत आहेत.
Nashik City Crime