इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
दाटून आलेला पाऊस कोसळू लागण्याच्या आत ऑफिस गाठण्याची लगबग करत निघालेले नाशिककर… शहरातील सर्वाधिक रहदारीपैकी एक असलेला कर्मयोगी नगरचा चौक… आणि त्यातच उन्मळून पडलेले दोन वृक्ष, ही खरे तर वाहतूक आणि व्यवस्थेची दाणादाण उडवून टाकणारी परिस्थिती. पण, केवळ दोघा जागरूक व सेवाभावी नागरिकांनी एकीकडे महापालिकेशी समन्वय साधत आणि दुसरीकडे पोलिसांचीही भुमिका बजावत ही समस्या लिलया हातळत सामाजिक सत्कार्याचा वसा जपल्याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले. बाबासाहेब गायकवाड (देशमुख) आणि बाळासाहेब राऊतराय अशी या दोघा नागरिकांची नावे आहेत..या कामामुळे नंतर नागरिकांनीही या दोघांचे कौतुक केले.
समाजातील विसंगतीवर बोट ठेवणे, अव्यवस्था चव्हाट्यावर मांडणे, लोकांना जागरूक करणे हे अंगभूत काम असलेल्या पत्रकारीतेच्या पेशातील बाबासाहेब गायकवाड (देशमुख) हे त्याही पुढे जाऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि सत्कार्य फाऊंडेशनच्या माध्यमातून सातत्याने कार्यशील असतात. समस्या दिसली की त्यातून लोकांना दिलासा देण्यासाठी ते कायम तत्पर असल्याची प्रचिती सोमवारच्या घटनेने दिली.
गोविंदनगर ते सिटी सेंटर मॉल हा शहरातील निवासी आणि व्यावसायिक भागांना जोडणारा प्रमुख रस्ता. त्यावरील कर्मयोगी नगर येथील आर. डी. सर्कल परिसर तर नेहमीच वाहनांच्या गर्दीने गजबजलेला असतो. येथे एक झाड सोमवारी उन्मळून पडले. हे झाड दुसर्या एका झाडावर पडल्याने तेही कोसळले. सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे अवघ्या काही मिनिटात वाहतूकीचा बोजवारा उडण्याची भीती तयार झाली. त्याचवेळी तिथून जात असलेल्या बाबासाहेब आणि बाळासाहेब या जोडगोळीने परिस्थीती हातात घेतली. त्यांनी लगोलग महानगरपालिका यंत्रणेशी संपर्क साधत कोसळलेली झाडे हटविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. महापालिकेची यंत्रणा तिथे दाखल होईपर्यंत वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी बाबासाहेब व बाळासाहेब या दोघांनी वाहतूक पोलिसांचीही भूमिका पार पाडली. तब्बल दीड तास त्यांनी ही खिंड लढवत शेकडो वाहनचालकांना खोळंबा होऊ न देता मार्गस्थ केले.
एकीकडे वाहतूक सुरळीत ठेवतांनाच महानगरपालिकेची यंत्रणा घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचावी म्हणूनही त्यांचे प्रयत्न सुरू होते. अखेर महानगरपालिका यंत्रणा दाखल झाली. पण, त्यांच्याकडून ती झाडे हटवून घेत वाहतूक सुरळीत झाल्यानंतरच बाबासाहेब आणि बाळासाहेब या जोडगोळीने तेथून पाय काढला.
nashik city news