नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वृध्दास धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटणे मोक्कान्वये कारवाईत फरार असलेल्या गावगुंडाच्या अंगलट आले आहे. शहर गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने या गुंडाचा शोध घेऊन त्यास उपनगर पोलिसांच्या स्वाधिन केले आहे. भावेश उर्फ गौरव किरण आव्हाड (२३ रा.पाटील गॅरेज मागे,एमजीरोड देवळाली गाव) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्यावर पोलिसांनी मोक्कान्वये कारवाई केलेली आहे. मात्र तो फरार होता.
या गुंडाने दत्तमंदिररोडवरील धोंडगेमळा भागात रविवारी (दि.२४) ही लुटमार झाली होती. जयंती भाई मधुभाई मांगरोलिया (७० रा.राजलक्ष्मी हॉल शेजारी) हे आपले कार्यालयीन काम आटोपून घरी परतले असता ही घटना घडली होती. घराजवळ कार पार्क करीत असतांना चार दुचाकींवर ट्रिपलसिट व डबलसिट आलेल्या दहा जणांच्या टोळक्यामधील बाशीभाई नामक तरूणाने त्यांच्या कानाखाली मारून धारदारशस्त्राचा धाक दाखवून खिशातील दोन हजार २०० रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. तसेच संशयिताने धारदार शस्त्राने कारची काच फोडून पोबारा केला होता. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात जबरीलुटमारीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेण्यात आल्याने पोलिस यंत्रणा कामाला लागली होती.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेकडून टोळक्याचा माग काढला जात असतांनाच गुंडा विरोधी पथकाचे अंबादास बकाल,अक्षय गांगुर्डे आणि गणेश भागवत यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. इंदिरानगर परिसरातील राजसारथी सोसायटी भागात संशयित येणार असल्याची माहिती मिळाल्याने मंगळवारी (दि.२६) या भागात सापळा लावण्यात आला असता संशयित पोलिसांच्या जाळ््यात अडकला. ही कामगिरी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते,अंमलदार मंलग गुंजाळ,अंबादास बकाल,डी.के.पवार,राजेश सावकार,सुनिल आडके,प्रदिप ठाकरे,मिलन जगताप,अक्षय गांगुर्डे,गणेश भागवत,गणेश नागरे,संदिप आंबरे आदींच्या पथकाने केली.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten