इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुंबई : शासनाची १० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर नंदुरबार शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतची माहिती पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ फेब्रुवारी २०१९ ते १८ जुलै २०१९ या कालावधीत अनधिकृत बिगर शेती वापर, शर्तभंग तसेच इतर प्रकरणात बनावट दस्तावेज तसेच शासनाच्या महसुलीच्या नुकसानी कारणीभूत ठरल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणाची कसून चौकशी सुरू केलेली आहे. दरम्यान तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने शासकीय कार्यालयांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्याविरुद्ध खातेनिहाय विभागीय चौकशी नेमण्यात आली. त्या चौकशीचे अधिकारी म्हणून नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती राज्य शासनाने केली होती.
चौकशीदरम्यान बालाजी मंजुळे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत अनेक भूमाफियांना लाभ होईल असे बेकायदेशी व बोगस आदेश मनमानी पद्धतीने पारित करून शासनाचा जवळजवळ ११ कोटी रुपयांचा महसूल बुडविल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याकारणाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश नंदुरबार जिल्हा प्रशासनास देण्यात आले. या भूमाफियांनी २००८ ते २०२० दरम्यान अनेक शासकीय, कुलकायदा, इनाम, देवस्थान, गुरचरण, गावठाण जमिनी बालाजी मंजुळे सारख्या अनेक भ्रष्ट अधिकारीच्या संगनमताने गिळंकृत केल्याची माहिती आहे.
महसूल विभागात खळबळ
मंजुळे हे फेब्रुवारी ते जुलै २०१९ मध्ये नंदुरबार जिल्हाधिकारी असताना त्यांनी अनधिकृत बिनशेती वापर, शरतीभंग प्रकरणे, भोगवटा वर्ग १ व २ रुपांतरीत करणे आदी १८ प्रकरणात त्यांनी शासनाचे १० कोटी ८२ लाख ६४ हजार २२० रुपयांचे नुकसान केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत विभागीय आयुक्त यांनी चौकशी केली होती. त्यानंतर हा गुन्हा दाखल झालाआहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल तहसीलदार अनिल गवांदे यांनी ही फिर्याद दिली आहे. यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
A case has been filed against the district collector for defrauding the government to the tune of 10 crores…