इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदेड : काही दिवसांपूर्वी २४ तासात २४ मृत्यू झाल्याचा प्रकार नांदेड येथील शासकीय रुग्णालयात घडला होता. त्या घटनेने संपूर्ण राज्य खडबडून जागे झाले होते. दरम्यान त्या मृत्यूंबाबत गठीत समितीने रुग्णालयाला क्लिनचीट दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा हे रुग्णालय रुग्णांच्या मृत्यूमुळे चर्चेत आले आहे.
काही दिवसांपूर्वी नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे झालेल्या मृत्यूतांडवाने सर्वत्र हाहाकार माजला होता. मृतांमध्ये काही नवजात बालकांचाही समावेश होता. ही घटना उघडकीस आल्यानंतर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले होते. विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षावर विविध आरोप केले. रुग्णालयात औषधांची कमतरता असल्याने संबंधित मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. पण रुग्णालयात औषधांची कमतरता नसल्याचे सरकारकडून सांगण्यात आले. असे असले तरी गेल्या आठ दिवसांत याच रुग्णालयात एकूण १०८ जणांचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात गेल्या आठ दिवसात सुमारे १०८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासांत एका अर्भकासह ११ रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत्यूबद्दल भाष्य करताना रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे यांनी, रुग्णालयात औषधांचा तुटवडा नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.
अशोक चव्हाणांचे असुविधेवर बोट
आम्ही पुरेशी औषधे साठवून ठेवली आहेत. तसेच वैद्यकीय कर्मचारी सर्व रुग्णांना मदत करत आहेत. औषधांच्या कमतरतेमुळे कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मृत्यू झाला,” असंही रुग्णालयाचे डीन म्हणाले. दरम्यान, मंगळवारी काँग्रेस ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले की, नांदेड येथील शासकीय रुग्णालयात नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) ६० हून अधिक अर्भकांना दाखल करण्यात आले होते. परंतु, बाळांची काळजी घेण्यासाठी फक्त तीन परिचारिका कार्यरत होत्या.