इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ठाणे पाठोपाठ नांदेड शहरातील शासकीय रुग्णालयात २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडल्यानंतर राज्यभर त्याचे पडसाड उमटलेले असतांना आज पुन्हा ७ जणांना मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे आतापर्यंत ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर या घटनेची माहिती दिली.
याबाबत अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, नांदेडमध्ये मृत्यूचे थैमान सुरूच. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश. राज्य सरकारने जबाबदारी निश्चित करावी, असेही चव्हाण ट्वीट मध्ये म्हटले आहेत.
राज ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल
तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे ट्वीट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, नांदेडमधल्या सरकारी रुग्णालयात गेल्या २४ तासात २४ मृत्यू झाले. ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. मध्यंतरी ठाण्यात देखील अशीच घटना घडली. राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये औषधाचा तुटवडा आहे. मुंबईत तर टीबीच्या औषधाचा तुटवडा असल्यामुळे ‘औषध पुरवून वापरा’ असा सल्ला दिला जातोय असं कळतंय. आणि ह्या घटना फक्त नांदेड, ठाणे आणि मुंबईपुरत्या नाहीत तर सर्वत्र आहेत.
तीन तीन इंजिनं लागून पण राज्याचं आरोग्य जर व्हेंटिलेटरवर असल्यासारखी परिस्थिती असेल तर उपयोग काय ? सरकारच्या तिन्ही पक्षांनी स्वतःचा पुरेसा विमा उतरवल्यामुळे त्यांना कसलीच काळजी नाहीये पण महाराष्ट्राचं काय ? दुर्दैव असं की सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत सोडून बाकी महाराष्ट्र आजारी आहे अशी परिस्थिती आहे. सरकारने स्वतःच आयुर्मान वाढवण्यासाठीची धडपड कमी करून महाराष्ट्राचं आरोग्य कसं सुधारेल ह्याकडे अधिक लक्ष द्यावं.