नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- कारने धडक दिल्याने शहरात वेगवेगळया भागात तीन अपघात झाले त्यात तीन दुचाकीस्वार ठार झाले तर एक जण जखमी झाला आहे. याप्रकरणी म्हसरूळ, अंबड आणि सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पहिला अपघात सातपूर औद्योगीक वसाहतीत झाला. या अपघातात संदिप दिलीप गायकवाड (३४ रा.महालक्ष्मी चौक,सातपूर) हा दुचाकीस्वार ठार झाला. गायकवाड गेल्या शनिवारी (दि.४) औद्योगीक वसाहतीतून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. बॉश कंपनी जवळील हेमल इन्फोट्रॉनिक्स या कारखान्यासमोरून तो दुचाकीवर घराकडे जात असतांना भरधाव आलेल्या एमएच ०५ एक्यू ४२८८ या बलेनो कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या गायकवाड याचा मृत्यू झाला असून याबाबत अंमलदार आर.एस.जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातपूर पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुस-या अपघातात दिंडोरी तालूक्यातील परशराम सिताराम शेखरे (३४ रा.कोकणगाव बु.ता.दिंडोरी) हे सोमवारी (दि.६) रात्री आपल्या दुचाकीवर दिंडोरीरोडने प्रवास करीत असतांना झाला. करी लिव्हज हॉटेल समोरून ते प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या विंगर कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात शेखरे यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार हिरामण दळवी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून कारचालक राकेश पाटील (रा.विजयनगर,सिडको) याच्याविरोधात म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास जमादार वाघ करीत आहेत.
तिसरा अपघात लेखानगर भागात झाला. गणेश भाऊराव डुंबरे (२८ रा.शिवपुरी चौक,पंडीतनगर) व ज्ञानेश्वर विक्रम कटारे (२७ रा.मोरवाडी,सिडको) हे दोघे मित्र मंगळवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास लेखानगर येथील स्टेट बँक चौकातून आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. आशा सोनोग्राफी सेंटर समोर भरधाव एमएच १५ एफएन ०७६९ या स्विफ्ट कारने दुचाकीस धडक दिली. या अपघातात डुंबरे याचा मृत्यू झाला तर कटारे जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत हवालदार नितीन राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालका विरोधात अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.
Nashik City Crime Police Theft dacoity murder suicide fight beaten