इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : नागपूरसह संपूर्ण विदर्भातील गरिबांना अत्यल्प दरात आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्याचे माझे स्वप्न आहे. उत्तर नागपुरातील डायग्नॉस्टिक्स सेंटर हे या दिशेने पहिले पाऊल आहे. आमचा हा प्रकल्प पूर्णपणे गरीब व गरजू नागरिकांना समर्पित असणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
लष्करी बाग कमाल चौक येथे स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेद्वारा संचालित डायग्नॉस्टिक सेंटरचे भूमिपूजन गडकरी व संस्थेच्या अध्यक्ष सौ. कांचनताई गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला विजयी भारत विकास संस्थेचे सचिव प्रभाकरराव येवले अध्यक्षस्थानी होते. तर, संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. सारंग गडकरी, सौ. केतकी कासखेडीकर, एएमटीझेड कंपनीचे संचालक डॉ. जितेंद्र शर्मा, डॉ. श्यामा नागराज, डॉ. नवल कुमार वर्मा, डॉ. अर्जून तमय्या, यशोदा हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. रजत अरोरा, आमदार प्रवीण दटके, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, माजी आमदार गिरीश व्यास आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, ‘डायग्नॉस्टिक्स सेंटर आमच्यासाठी पैसे कमावण्याचे माध्यम नाही आणि राजकीय स्वार्थासाठी देखील हा उपक्रम नाही. माझ्या आईच्या नावाने स्थापन झालेल्या ट्रस्टच्या वतीने याचे संचालन होणार आहे आणि या कामाचा संबंध मानवतेशी आहे. माझ्या आईने स्वतःच्या संकटाच्या काळातही गरिबांची सेवा केली. ‘गोर-गरीब जनतेला जेवढे देशील, त्याच्या दहापट मिळवशील,’ असा मंत्र मला आईने दिला. तिच्याच प्रेरणेतून गरिबांना आंतरराष्ट्रीय दर्जाची आरोग्यसेवा पुरविण्यासाठी हे सेंटर उभे होत आहे.’
या सेंटरमध्ये एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे, डायलिसीस, पॅथोलॉजी टेस्ट अत्यंत माफक दरात होणार आहेत. त्यासाठी एएमटीझेड कंपनी आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे उपलब्ध करून देणार आहे, अशी माहितीही ना. श्री. गडकरी यांनी दिली. यावेळी स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचे विश्वस्त श्री. संजय टेकाडे, श्री. प्रकाश टेकाडे व श्री. दिलीप धोटे यांच्यासह श्री. गणेश कानतोडे, माजी स्थायी समिती सभापती विक्की कुकरेजा, डॉ. विक्की रुघवानी, संजय चौधरी, सुरेश कुमरे, प्रभाकर तारेकर, जगदीशप्रसाद आशिया, पी. सी. एच. पात्रुडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
समर्पणाचा सत्कार
डायग्नॉस्टिक्स सेंटरसाठी विशेष परिश्रम घेणारे विजयी भारत विकास संस्थेचे सचिव श्री. प्रभाकर येवले यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. साडेचारशे निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्याबद्दल माजी खासदार डॉ. विकास महात्मे यांनाही यावेळी गौरविण्यात आले. तसेच डॉ. दामोदर जपे, डॉ. संजय शर्मा, डॉ. श्यामा नागराज, श्री. अमित शर्मा यांचा विशेष सत्कार झाला. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या निःशुल्क नेत्र व कर्ण तपासणी अभियानाची धुरा सांभाळणारे डॉ. गिरीश चरडे, डॉ. श्रीरंग वराडपांडे, डॉ. अजय सारंगपुरे, श्री. विलास सपकाळ यांचा ना. श्री. गडकरी यांनी आवर्जून उल्लेख केला.
रुग्णवाहिकांचे लोकार्पण
यावेळी निःशुल्क नेत्र व कर्ण तपासणीसाठी एका अतिरिक्त रुग्णवाहिकेचे तसेच दंत तपासणीसाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेचे लोकार्पण ना. श्री. गडकरी यांच्या हस्ते झाले. दंत तपासणी व उपचारासाठी असलेल्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दात स्वच्छ करणे, दात काढणे, कवळी बसविणे यासह मुख कर्करोगाचे निदान व उपचार आदी सुविधा पुरविल्या जाणार आहेत.
—