इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर : नागपूरमध्ये शनिवार, दि. २३ सप्टेंबरला पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले तर नागनदीही दुथडी भरून वाहू लागली. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या एकूणच परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ना. नितीन गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महानगरपालिकेत संयुक्त बैठक घेऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात महत्त्वाच्या सूचना दिल्या.
महानगरपालिकेत झालेल्या बैठकीला आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, माजी महापौर माया इवनाते, माजी महापौर संदीप जोशी, माजी उपमहापौर संदीप जाधव, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, मनपा अतिरिक्त आयुक्त आचल गोयल यांची उपस्थिती होती. पंचशील चौकात नाग नदीवर असलेला पूल अत्यंत धोकादायक असून त्याच्या कायमस्वरूपी दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश गडकरी यांनी दिले.
ज्या भागामध्ये नागनदीवरील भिंत तुटली आहे तिथे वस्तीमधील लोकांच्या घरात पाणी शिरले. पाणी ओसरल्यावर घरांमध्ये गाळ साचला आहे. तो गाळ काढण्यासाठी नागरिकांना मदत करण्याच्या सूचना गडकरी यांनी दिल्या. आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतानाच एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच शहर पोलिसांना तत्पर राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तत्पूर्वी, शनिवारी दुपारी नागपुरातील पूरग्रस्तांच्या जेवणाची व्यवस्था करण्याचे आवाहन गडकरी यांनी शहरातील स्वयंसेवी संस्थांना केले. या आवाहनाला विविध संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व अनेक भागांमध्ये व्यवस्था करण्यात आली.
सायंकाळी गडकरी यांनी अंबाझरी ओव्हरफ्लो पॉईंट, डागा ले आऊट, शंकरनगर आदी ठिकाणी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. यावेळी माजी महापौर नंदा जिचकार, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांची उपस्थिती होती. अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्यामुळे ज्या वस्त्यांमध्ये पाणी शिरले तेथील मदतकार्य, ज्यांची घरे पाण्याखाली आली त्यांना जीवनावश्यक बाबींचा पुरवठा आदींची माहिती ना. श्री. गडकरी यांनी घेतली. या अनपेक्षित अतिवृष्टीमुळे अनेकांवर संकट आले. त्यांना योग्य मदत पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे ना. श्री. गडकरी म्हणाले. अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटातून सावरण्यासाठी तातडीने उपाययोजना सुरू आहेत. याशिवाय भविष्यात अशाप्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे आदेशही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. शंकरनगर येथे नागनदीच्या काठावर असलेल्या वस्तीमध्ये मंत्री महोदयांनी पाहणी केली तसेच स्थानिक नागरिकांशी चर्चा केली.
महानगरपालिकेच्या सिटी ऑपरेशन सेंटरला भेट
नागपूर महानगरपालिकेतील स्व. अटलबिहारी वाजपेयी सिटी ऑपरेशन सेंटरला रात्री भेट देऊन नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील लाईव्ह परिस्थिती बघितली. शहरातील ब्लॅक स्पॉट निश्चित करण्याच्या सूचना देऊन डागडुजी करण्याचे आदेश दिले.
Union Minister Nitin Gadkari reviewed the flood situation in Nagpur