नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अशोक ले-लँड आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दि. १६ सप्टेंबर २०२३ ला ‘डबल डेकर’ इलेक्ट्रीक बसचा (ग्रीन बस) लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या बसचे लोकार्पण होईल. हा कार्यक्रम ना. नितीन गडकरी यांचे निवासस्थान, एन्रीको हाईट्स, हॉटेल रेडिसन ब्लूजवळ, वर्धा रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ज्येष्ठ नेते दत्ताजी मेघे राहतील. तर स्विच मोबिलिटीचे सीईओ महेश बाबू, अशोक ले-लँड लिमिटेडचे उपाध्यक्ष (कॉर्पोरेट अफेअर्स) यश सच्चर, पश्चिम व मध्य झोनचे प्रमुख ए. के. सिन्हा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, माजी खासदार डॉ. श्री. विकास महात्मे, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार डॉ. श्री. गिरीश गांधी, माजी आमदार प्रा. अनिल सोले, माजी आमदार अशोक मानकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी आमदार नागोजी गाणार, माजी महापौर नंदा जिचकार, भाजप शहराध्यक्ष बंटी कुकडे, राजाभाऊ लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती राहील. अशोक ले-लँडच्या सीएसआर उपक्रमांतर्गत ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला ही बस उपलब्ध करून देण्यात आली आहे.
ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या नि:शुल्क धार्मिक स्थळ तसेच पर्यटनस्थळांच्या सहलीसाठी या डबल डेकर ग्रीन बसचा उपयोग केला जाणार आहे. सद्यस्थितीत प्रतिष्ठानकडे ऑलेक्ट्रा कंपनीची एक ग्रीन बस असून ही बस गेल्या पाच वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांच्या सेवेत आहे. या ग्रीन बसद्वारे शेगाव, माहूर, कळंब, आंभोरा, आदासा, धापेवाडा आदी धार्मिक स्थळांच्या निःशुल्क सहलीचा हजारो ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे. ना. श्री. नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांतून या दोन्ही बसेस ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानला मिळाल्याची माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव डॉ. राजू मिश्रा यांनी दिली.
अशी आहे ‘डबल डेकर’ ग्रीन बस
अशोक ले-लँड कंपनीची ही डबल डेकर ग्रीन बस वातानुकुलित असून यात ६५ प्रवाशांची बसण्याची व्यवस्था आहे. अॅडव्हान्स लिथियन-आयर्न बॅटरीवर चालणारी ही बस दीड ते तीन तासाच्या एका चार्जिंगमध्ये २५० किमी धावू शकते. या डबल डेकर बसची उंची ४.७५ मीटर असून लांबी ९.८ मीटर आणि रुंदी २.६ मीटर आहे.
‘Double decker’ green bus in the service of senior citizens… Nitin Gadkari’s signature